मविआने आवळली वज्रमूठ, कर्नाटक निकालाने बळ; जागावाटपाची चर्चा लवकरच
By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2023 06:05 AM2023-05-15T06:05:36+5:302023-05-15T06:06:36+5:30
उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन स्थगित करण्यात आलेली वज्रमूठ सभा पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला.
मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या घवघवीत यशानंतर राज्यातील महाविकास आघाडीतही उत्साहाचे वातावरण आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्त्वाची बैठक रविवारी मुंबईत शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी झाली.
उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन स्थगित करण्यात आलेली वज्रमूठ सभा पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी तीनही पक्षाचे प्रमुख आणि इतर घटक पक्ष बसून जागा वाटपाबाबत चर्चा करण्याचा निर्णयही या बैठकीत झाला. कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा झालेला एकहाती विजय आणि राज्याच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरही बैठकीत चर्चा झाली.
महाराष्ट्रातही एक ठाम राजकीय पर्याय देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचा असणार आहे, यावर या बैठकीत एकमत झाल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी यावेळी सांगितले.
कोण कोण होते उपस्थित : राष्ट्रवादीकडून स्वतः शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, संजय राऊत, तर काँग्रेसकडून नाना पटोले, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, भाई जगताप, नसीम खान हे नेते बैठकीला उपस्थित होते.
कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातही जनतेच्या विश्वासाला पात्र ठरून अधिक मोठ्या संख्येने आणि ताकदीने महाविकास आघाडी पुढच्या काळात काम करेल, असा विश्वास महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बैठकीनंतर व्यक्त केला.
आघाडीत नाराजी नाही
महाविकास आघाडीत कुठेही नाराजी नाही, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी यावेळी स्पष्ट केले. ‘वज्रमूठ’ची एक मोठी सभा पुण्यात करून त्यात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्याबाबत चर्चा झाल्याचेही पटोले यांनी सांगितले.
कर्नाटकच्या विजयाने पूर्ण देशाला एक ऊर्जा मिळाली आहे. असंवैधानिक पद्धतीने राज्यातील ठाकरे सरकार पाडले गेले, ते सर्वोच्च न्यायालयाने समोर आणले आहे. याबाबत आम्ही लोकांपर्यंत निकालाची माहिती पोहोचवणार असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले.