पिंपरी, दि. 16 - गतवर्षी कामशेतजवळील खडकाळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीवेळी मनसेचे तालुकाध्यक्ष मंगेश उर्फ बंटी वाळुंज यांचा भरदिवसा गोळ्या घालून निर्घृण खून झाला होता. ऐन निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या खूनाच्या घटनेनंतर दीड वर्षात अशाच खूनाच्या घटना आणखी घटना घडल्या. महिनाभरापुर्वीच तळेगाव नगरपरिषदेचे नगरसदस्य व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष बापू भेगडे यांच्यावरील खूनी हल्याचा कट फसला. शस्त्र घेऊन हल्याच्या तयारीत आलेले आरोपी पोलिसांच्या हाती लागल्याने ही घटना टळली. काही दिवस उलटताच रविवारी भरदिवसा तळेगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांचा निर्घृन खून झाला. मावळात राजकीय वैमनस्य धुमसत असल्याचा या घटनांतून प्रत्यय आला आहे.
तळेगावात गुन्हेगारी टोळया सक्रिय असून त्यांचा उपद्रव वेळोवेळी जाणवतो. सुपारी देऊन खून केल्याच्या घटना तळेगावसह मावळ तालुक्यात घडल्या आहेत. ग्रामपचांयत अथवा नगरपरिषदेची निवडणूक असते, त्यावेळी या गुन्हेगारी टोळ्या अधिक सक्रिय होतात. राजकीय वैमनस्यातुन घडणाºया घटना नागरी सुरक्षेच्या दृष्टीने धोक्याचे संकेत देणाºया आहेत. लोकप्रतिनिधी अथवा समाज संघटनाचे काम करणा-यांवर असे हल्ले होत असतील, तर सामान्य नागरिकांचे काय? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. अशा घटनांमुळे त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
२०१० मध्ये माहिती अधिकार कार्यकर्ते सतिश शेट्टी यांचा तळेगाव येथे भर चौकात वर्दळीच्या ठिकाणी खून झाला होता. शेट्टी यांच्या खूनाच्या खळबळजनक घटनेने राज्यभर तळेगावच्या गुन्हेगारीची चर्चा झाली. मुंबई, पुणे शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये खूनाच्या गंभीर घटना घडतात. परंतु त्या घटना गुन्हेगारी टोळ्यांमध्ये घडत असतात. शहरांमध्ये राजकारणी अथवा सामाजिक कार्यकर्ते लक्ष्य केले जात नाही. तळेगाव आणि मावळ परिसरात मात्र राजकीय व्यकतींना टार्गेट केले जात आहे. सुपारी घेणाºया गुंडाच्या टोळया या भागात कार्यरत आहेत. या परिसरातील गुन्हेगारी वेगळया स्वरुपाची असून गुन्हेगारीला एक प्रकारे राजाश्रय मिळू लागला असल्याचे बोलले जात आहे. मावळातील आंबेगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ता रसाळ यांचा सहा महिन्यांपुर्वी ग्रामपंचायतीची निवडणूक होताच राजकीय वैमनस्यातुन काटा काढण्यात आला. ग्रामपंचायत ते नगरपरिषद निवडणुकीच्या वेळी अशा घटना घडू लागल्याने चिंता व्यक्त होत आहे.