मुंबई - FDI In Maharashtra ( Marathi News ) महाराष्ट्रातील प्रकल्प इतर राज्यात पळवले जात आहेत असा आरोप विरोधकांकडून सातत्याने सरकारवर केला जातो. त्यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेने परदेशी गुंतवणूक सर्वाधिक असल्याचं सांगत थेट आकडेवारीच जाहीर केली आहे. २०२२-२३ या काळात राज्यात १ लाख ८३ हजार ९२४ कोटींची प्रत्यक्ष परदेशी गुंतवणूक झाली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूक महाराष्ट्रात आल्याबद्दल फडणवीसांनी सर्वांचं अभिनंदन केले आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटलंय की, २०२२-२३ या आर्थिक वर्षांत १,१८,४२२ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक करुन महाराष्ट्र क्रमांक १ वर आला होता.२०२३-२४ च्या पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून २०२३) या कालावधीत ३६,६३४ कोटी रुपये परकीय गुंतवणूक आली. आता २०२३-२४ च्या दुसर्या तिमाहीची (जुलै ते सप्टेंबर २०२३) सुद्धा आकडेवारी आली असून यात २८,८६८ कोटी रुपयांचा एफडीआय आकर्षित करुन पुन्हा महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आला आहे असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत एप्रिल ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत एकूण ६५,५०२ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात आली असून, ती जवळजवळ कर्नाटक, दिल्ली आणि गुजरात या तीन राज्यांतील एकत्रित गुंतवणुकीइतकी आहे. एप्रिल २०२२ ते सप्टेंबर २०२३ असा एकत्रित विचार केल्यास १,८३,९२४ कोटी रुपयांचा एफडीआय महाराष्ट्रात आला आहे. सरकारची यशस्वी घौडदौड सुरू असून परदेशी गुंतवणूकदारांची महाराष्ट्राला पसंती आहे असं सांगत फडणवीसांनी सर्वांचे अभिनंदन केले.
महाराष्ट्रातून उद्योग गुजरातला जात असल्याचा आरोपमहाराष्ट्रातील मोठे प्रकल्प राज्यातून पळवून गुजरातला नेण्याचे ‘उद्योग’ मागील दीड वर्षांपासून सातत्याने सुरु आहेत. वेदांता-फॉक्सकॉनसह अनेक उद्योग गुजरातला देऊन शिंदे-फडणवीस-पवार हे महाराष्ट्राला अधोगतीकडे घेऊन जात आहेत. मुंबई व महाराष्ट्राचे महत्व कमी करण्यात विद्यमान भाजपा सरकार कसलीही कमतरता भासू देत नाही. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले जात आहेत. मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न होतोय अशाप्रकारचा आरोप सातत्याने विरोधकांकडून केला जातो.