मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि रत्नागिरी-सिंधुदूर्गचे लोकसभा उमेदवार नारायण राणे यांची मैत्री सर्वांनाच माहिती आहे. दोघेही एकेकाळी शिवसेनेत होते. राज ठाकरेंमुळेच मी वाचलो आणि रातोरात शिवसेनेतून बाहेर पडलो, असे खळबळजनक वक्तव्य राणे यांनी केले होते. याच राज ठाकरेंना तेव्हा सिंधुदूर्गात राणे समर्थकांच्या तीव्र विरोधामुळे ताफा घेऊन माघारी फिरावे लागले होते. इतिहासाच्या पानांवर या घटना नोंद आहेत, असे असताना राज ठाकरे नारायण राणेंसाठी कणकवलीत येत आहेत.
राज ठाकरेंची कणकवलीतील उपजिल्हा रुग्णालया समोरच्या खुल्या पटांगणावर सभा होण्याची शक्यता आहे. ४ मे रोजी राज ठाकरे कणकवलीला येत आहेत. राज यांनी भाजपाला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या कोकणात राज यांची सभा व्हावी यासाठी शिवसेना आणि भाजपा आग्रही आहेत. मनसेचा प्रभाव असलेल्या जागांवर राज यांच्या सभा आयोजित करण्यात येणार आहेत. अद्याप याचे टाईम टेबल ठरलेले नसले तरी ४ मे रोजी राज कणकवलीच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे समजते आहे.
सभेचे ठिकाण अत्यंत मोक्याचे निवडण्यात आले आहे. या ठिकाणापासून राणेंचा जय गणेश बंगला एक ते दीड किमी अंतरावर तर वैभव नाईक यांचा बंगला अगदी हाकेच्या अंतरावर आहे. रत्नागिरीमध्ये मनसेचा मेळावा पार पडला होता. यामध्ये नारायण राणे, उदय सामंत यांनी या मेळाव्याला राज ठाकरे नसल्याची खंत व्यक्त केली होती. यानंतर सर्व सुत्रे हलली आहेत.
राज ठाकरेंचा ताफा का माघारी फिरला होता? काय होता तो किस्सा...नारायण राणे बाहेर पडले तेव्हा राज ठाकरे शिवसेनेत होते. पोटनिवडणुकीत शिवसेनेविरोधी वातावरण तयार झाले होते. ठाकरेंनी सर्व आमदार, खासदार सिंदुदूर्गमध्ये धाडले होते. त्यांच्यासोबत फिरायला कोणी नव्हते अशी केविलवाणी अवस्था तेव्हा शिवसेनेची झाली होती. याच काळात राज ठाकरे देखील सिंधुदूर्गच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी राणे समर्थकांनी राज यांचा ताफा अडविला होता. तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने तेव्हा राष्ट्रवादीत असलेल्या संदेश पारकर आणि समर्थकांनी राज यांना माघारी फिरण्याची विनंती केली होती. पुन्हा याल तेव्हा आम्ही तुमचे स्वागत करू, असे राष्ट्रवादीने आश्वासन दिले होते. वातावरण पाहून राज यांनी आपला ताफा माघारी वळविला होता. यानंतर काही वर्षांनी पुन्हा राज हे दौऱ्यावर आले असता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांचे बोलल्याप्रमाणे स्वागत केले होते.