सोलापूर : भाजपला बहुमत न मिळाल्यास नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार नाहीत. अशावेळी तिसरी आघाडी सत्तेत यावी यासाठी आम्ही प्रयत्न करु. राहुल गांधी की मायावती, असा मुद्दा आला तर आम्ही मायावतींना पाठिंबा देऊ. शरद पवारांचा विषय आलाच तर त्यांना विरोध करु, हे स्पष्ट आहे, असे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.
दुष्काळी दौºयानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर म्हणाले, लोकसभेची निवडणूक ही राजकीय विचारांची लढाई आहे. मोदींनी त्याला वैयक्तिक पातळीवर आणून ठेवली आहे. निवडणुकीचा तिसरा आणि चौथा टप्पा संपल्यानंतर त्यांना बिकट परिस्थितीचा अंदाज आला आहे. मोदींचा तोल सुटला आहे. ही लढाई आपल्या हातून गेल्याचा अंदाज आल्यामुळे ते वैयक्तिक टीका करू लागले आहेत. लोकसभा निवडणूक लढविताना आम्ही विधानसभेचा निर्णय पक्का केला होता.
विधानसभेला काँग्रेससोबत आघाडीचा अजिबात विचार नाही. प्रस्ताव आला तरी विचार होणार नाही. वंचित बहुजन आघाडी सर्व २८८ जागा लढविणार आहे़ धनगर समाजाने सोलापूर जिल्ह्यात उठाव केला होता. त्यामुळे या भागातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेण्यात आला. सोलापूर आणि अकोल्यात काय होईल हे समजून घेण्यासाठी २३ मे ची वाट पाहा, असेही त्यांनी सांगितले.