वैभव गायकर । लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या महापौरपदावर डॉ. कविता चौतमल व उपमहापौरपदी चारुशीला घरत यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सोमवारी महानगरपालिकेच्या पहिल्या विशेष महासभेत ही निवड झाल्यानंतर महापौर, उपमहापौरांच्या दालनाचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याने दालनांचे काम पूर्ण कधी होणार? हा प्रश्न सर्वांना पडला आहे. त्यामुळे महापौरांना दालनासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.पनवेल महानगरपालिकेच्या नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतीत एकूण तीन मजल्यांमध्ये महापौर, उपमहापौर यांच्यासह विरोधी पक्षनेता, सभागृह नेता, सभापती, स्थायी समिती सभापती आदींची दालने तयार करण्यात येत आहेत. याकरिता पालिकेने ६६ लाख रुपयांचे टेंडर काढून ते काम कंत्राटदाराला दिले आहे. मात्र, महापौर-उपमहापौराची निवड होऊनदेखील त्यांना बसायला जागाच नसल्याने महानगरपालिकेचा कारभार धिम्या गतीने होत असल्याचे दिसून येत आहे. एकूण तीन माळ्यांच्या या इमारतीच्या पहिल्या माळ्यावर विरोधी पक्षनेते, सभागृह नेते, सभापती यांची दालने असणार आहेत. तर दुसऱ्या मजल्यावर महापौर, उपमहापौर व स्थायी समिती सभापती यांची दालने असणार आहेत.
महापौर, उपमहापौरांना दालनाची प्रतीक्षा
By admin | Published: July 12, 2017 2:37 AM