पिंपरी-चिंचवड: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेपिंपरी-चिंचवड शहरात आल्यानंतर महापौर राहुल जाधव यांनी त्यांची भेट घेतली. विशेष म्हणजे जाधव हे राज ठाकरे यांच्यासमोर नतमस्तक झाले. जाधव यांनी चरणस्पर्श केल्यावर राज ठाकरेंनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
एका खासगी कार्यक्रमानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे शुक्रवारी चिंचवडमध्ये आले होते. त्यावेळी महापौर राहुल जाधव यांनी कार्यक्रमस्थळी उपस्थित राहून ठाकरे यांचं स्वागत केलं. महापौर राहुल जाधव पूर्वी मनसेमध्ये होते. राज ठाकरेच्या व्यक्तीमत्त्वानं प्रभावित झालेले जाधव 2004 मध्ये राजकारणात आले. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 2012 च्या निवडणुकीत मनसेच्या तिकीटावर ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते.
यानंतर फेब्रुवारी 2017 मध्ये ते भाजपाकडून निवडून आले आहेत. काही दिवसांपूर्वीच त्यांनी महापौरपदाची शपथ घेतली. परंतु, अद्यापही त्यांच्या मनात राज ठाकरेंबद्दल आदराची भावना आहे. त्यामुळेच राज ठाकरेंना भेटताच जाधव यांनी त्यांचे पाय धरले. राज ठाकरेंनी संधी दिल्यानंच आपण इथपर्यंत पोहोचल्याचं त्यांनी सांगितलं. जाधव महापौरपदी विराजमान झाल्यानंतर आज पहिल्यांदाच ठाकरे शहरात आले होते. जेव्हा-जेव्हा मदत लागेल, त्यावेळी भेटायला या, असं ठाकरे यांनी यावेळी जाधव यांना सांगितलं.