नवी मुंबई : मे महिन्याअखेरीस मान्सूनपूर्व काम पूर्ण करण्याचे आश्वासन नागरिकांना देण्यात आले होते. या कामाची पाहणी करण्यासाठी शुक्रवारी महापौर सुधाकर सोनवणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बेलापूर ते वाशी अशा नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्राचा दौरा केला. यावेळी गटारे व नालेसफाई कामांची तसेच होल्डिंग पाँड आणि भुयारी मार्ग असलेल्या भागांची पाहणी केली.सीबीडी बेलापूर येथील होल्डिंग पाँडपासून पाहणी दौऱ्यास सुरुवात करुन त्यांनी पावसाळीपूर्व कामांची पाहणी केली. या दौऱ्यात विशेषत्वाने मागील वर्षी पाणी साचलेली ठिकाणे व त्या अनुषंगाने महापालिकेने या पावसाळ्यापूर्वी केलेल्या उपाययोजनांची त्यांनी पाहणी केली.गटारे व नाले साफसफाई कामांचे पूर्वनियोजन केलेले असल्यामुळे ही कामे योग्य वेळेत पूर्ण होतील व पावसाळी कालावधीत नागरिकांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही असा विश्वास महापौर सुधाकर सोनवणे यांनी व्यक्त केला. पुन्हा एकदा पावसाळ्यापूर्वीच सर्व विभागांचा तपशीलवार आढावा घेणारा पाहणी दौरा करणार असल्याचेही महापौरांनी सांगितले.पाहणी दौऱ्यात त्यांच्या समवेत सभागृह नेते जयवंत सुतार, परिवहन सभापती साबू डॅनिअल, पाणीपुरवठा व मलनि:सारण समिती सभापती अशोक गुरखे, पक्षप्रतोद जयाजी नाथ, नगरसेविका तनुजा मढवी, संगीता बोऱ्हाडे, मीरा पाटील, शिल्पा कांबळी, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त तुषार पवार, संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
महापौरांनी केला मान्सूनपूर्व कामांचा दौरा
By admin | Published: June 11, 2016 3:22 AM