विकास राऊत
औरंगाबाद, दि. १३ - महापालिकेच्या सिध्दार्थ उद्यानातील प्राणीसंग्रहालयातील समृध्दी या वाघिणीच्या तीन पिलांचे गुरुवारी वीर, शक्ती आणि भक्ती असे नामकरण करण्यात आले. यावेळी महापौर भगवान घडामोडे आणि सभापती मोहन मेघावाले यांनी दोन महिन्यांच्या बछड्याबरोबर फोटोसेशन करून हौस भागविल्याने वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन झाले आहे. या पदाधिकाºयांना हे फोटोसेशन महागात पडण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षात वाघांचे बछडे महिन्याच्या आतच दगावल्यामुळे यावेळी प्राणीसंग्रहालयाने खबरदारी घेत अडीच महिन्यांपासून आई समृध्दीच्या अवतीभोवती छोट्याशा पिंज-यात त्या बछड्यांना ठेवले होते. नाव ठेवण्याच्या निमित्ताने त्यांना गुरूवारी पिंजºयाबाहेर काढण्यात आले. महापौर घडामोडे, सभापती मेघावाले यांच्यासह महापालिका पदाधिकाºयांनी त्यांचे नामकरण केले. यातील एका बछड्याच्या डोक्यावर हात ठेऊन त्याला कुरवाळण्याचा मोह महापौर आणि सभापतींना काही आवरला नाही. पंधरा दिवसानंतर हे बछडे प्राणीसंग्रहालयात पाहण्यासाठी सोडण्यात येणार आहेत.
सिद्धार्थ उद्यान प्राणीसंग्रहालयातील रॉयल बेंगॉल टायगर पिवळ्या समृध्दी वाघिणीने १२ नोव्हेंबर २०१६ रोजी पहाटे चार वाजता तीन बछड्यांना जन्म दिला. दोन पिवळ्या तर एका पांढ-या बछड्याला तिने जन्म दिल्यामुळे तो कुतुहलाचा विषय बनला होता. या तीन बछड्यांपैकी एक पांढरे आणि एक पिवळे असे दोन नर असून एक मादा आहे. तिन्ही बछड्यांची प्रकृती सध्या ठिक आहे. पिवळ्या बछड्यांपैकी एकाचे वजन ६ किलो तीनशे ग्रॅम, दुस-याचे ६ किलो तर पांढ-या बछड्याचे ७ किलो २०० ग्रॅम इतके आहे.
तीन महिन्यानंतर या बछड्यांना मोठ्या पिंजºयात खुल्या वातावरणात सोडण्यात येते. गुरुवारी या बछड्यांना पहिल्यांदा आईच्या कुशीतुन बाहेर आणण्यात आले. त्यांना बाहेर आणण्यापुर्वी प्राणीसंग्रहालय व्यवस्थापनाने पिंज-यात त्या बछड्यांना नैसर्गिक वातावरणात, जंगलात फिरत असल्याचा तसेच उंचावर जाऊन खाली उतरण्याचा सराव व्हावा, यासाठी कृत्रिमरित्या तयार केलेले उंचवटे, बोगदे, गुफा यांवर नेले.
महापौर घडामोडे, स्थायी समिती सभापती मोहन मेघावाले, सभागृह नेते गजानन मनगटे व विरोधी पक्षनेते अय्युब जहागिरदार यांनी मिळून तिन्ही बछड्यांचे नामकरण केले. महापौरांनी शिव, शक्ती व भक्ती अशी नावे सूचविली होती. परंतु पांढºया बछड्याचे शिव ऐवजी वीर नाव ठेवण्यात आले.
महापौर, सभापतींनी केला आग्रह
वाघांच्या बछड्यांची तीन महिन्यांपर्यंत खूप काळजी घेतली जाते. त्यांना पशुवैद्यकिय डॉक्टर व कर्मचा-यांच्या व्यतिरिक्त इतर मानवी स्पर्शापासून शक्यतो दूर ठेवले जाते. मात्र नामकरण कार्यक्रमाच्या निमित्ताने महापौर भगवान घडामोडे, सभापती मोहन मेघावाले यांनी बछड्यांसोबत फोटो घेण्याचा आग्रह धरल्याने केअरटेकरने नाईलाजाने बछड्यांना त्यांच्या पुढे केले. सभापतींनी बिनदिक्कत वाघाच्या बछड्याच्या डोक्यावरुन हात फिरवला, मात्र महापौरांचे हात थोडेसे अडखळले.
माजी मंत्र्यांना भोवले होते प्रकरण
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी आॅगस्ट २००९ मध्ये नागपूर येथील महाराजबाग प्राणीसंग्रहालयात वाघासोबत फोटोसेशन केले होते. त्यांना हे प्रकरण भोवले होते. वन्यजीव संरक्षण कायद्याचे त्यांच्याकडून उल्लंघन झााले होते. राज्यभरातून त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती.
तज्ज्ञांचे मत असे...
महाराष्ट्र पक्षीमित्र सल्लागार अभय उजागरे यांना याप्रकरणी लोकमतने संपर्क केला असता ते म्हणाले, हा प्रकार बेकायदेशीरच आहे. झू अॅथॉरिटी आॅफ इंडियाने याप्रकरणी बछड्यांना कुणी हाताळावे. तसेच वाघाच्या पिंजºयात कुणी जावे, याच्या अटी व शर्ती सांगितल्या आहेत. पशुवैद्यकिय डॉक्टर्स शिवाय इतर माणसाला तिथे जाणे शक्य नाही. ती वाघिणीची पिले आहेत. त्यांना हात लावणे हे एखाद्या अनाकलनीय प्रसंगाला आव्हान देण्यासारखे आहे.
कायदा काय सांगतो....
केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या कायद्यानुसार प्राणीसंग्रहालयातील कुठल्याही प्राण्याला हाताळण्याचा अधिकार केवळ किपरलाच आहे. त्याने देखील फोटोग्राफी किंवा इतरांना हौसेखातर दाखविण्यासाठी प्राण्यांना हाताळणे वर्ज्य आहे. असे केल्यास त्याचे वा प्राणीसंग्रहालय संचालकाचे निलंबन करण्याची तरतूद आहे.