मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी मुंबईतील महापौर निवास उपलब्ध करून देण्यासाठी कायद्यात सुधारणा करणारे विधेयक मंगळवारी विधानसभेत मंजूर करण्यात आले. मात्र हे विधेयक मंजूर झाले तेव्हा राजाभाऊ वाजे यांचा अपवाद वगळता शिवसेनेचा एकही आमदार किंवा मंत्री सभागृहात उपस्थित नव्हता.मुंबई महापालिका अधिनियमानुसार माहापालिकेची मालमत्ता काही सार्वजनिक कामे वगळता अन्य कारणासाठी बाजारभावापेक्षा कमी दराने देता येत नाही. त्यामुळे या कायद्याच्या कलम ९९मध्ये सुधारणा करून या अपवादात स्मारकाचा समावेश करण्याचा निर्णय घेऊन डिसेंबर महिन्यात याचा अध्यादेश काढण्यात आला होता. अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करणारे विधेयक मंगळवारी विधानसभेत मंजूर झाले.विधेयक मांडताना व त्यावरील चर्चेला उत्तर देताना नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी शिवसेनाप्रमुखांच्या नेतृत्वाला साजेसे स्मारक उभारण्यासाठी सीआरझेडची कोणतीही अडचण येणार नाही. अडचणी आल्यास त्या दूर करू, असा विश्वास व्यक्त केला. विधेयकवरील चर्चेत सहभागी होताना जयंत पाटील यांनी भाजपावर टीका केली. निवडणुकीच्या काळात भाजपाने शिवसेनेवर झेंडा हातात घेऊन हप्ते मागणारा पक्ष, अशी टीका केली. मुख्यमंत्र्यांनी त्यांची औकात काढण्याची भाषा केली. मात्र तरीही निवडणुकीत शिवसेनाच पहिल्या क्र मांकावर राहिली. (विशेष प्रतिनिधी)शिवसेनेचे मंत्री, आमदार गैरहजरशिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी महापौर बंगला हस्तांतरित करण्याबाबतचे विधेयक चर्चेला आले तेव्हा शिवसेनेचा एकही मंत्री सभागृहात उपस्थित नव्हता. आमदारांपैकी केवळ सिन्नरचे राजाभाऊ वाजे हे एकमेव सदस्य सभागृहात उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांनी ही बाब निदर्शनास आणून देताना हे विधेयक पुढे ढकलण्याची उपरोधिक सूचना केली.- राज्याची सत्ता जाण्याची वेळ आल्याने महापालिकेची सत्ता द्यावी लागली, अशी टीका करत ही कटुता दूर करण्यासाठी भाजपाने स्मारकाचे बिल पहिल्याच दिवशी आणले, असे जयंत पाटील म्हणाले. महापौरांचा सन्मान कायम राहावा, यासाठी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्याच्या बाजूचा शासकीय बंगला महापौर निवास म्हणून दिला जावा, अशी सूचनाही त्यांनी केली.
महापौर बंगला हस्तांतरित होणार
By admin | Published: March 08, 2017 5:53 AM