सोलापूर: राज्यातील सत्ता बदलानंतर महापालिकेतही महापौरपदाच्या निवडणुकीत महाआघाडीची मोर्चेबांधणी सुरू आहे. उपमहापौरपदाच्या उमेदवारीवरुन भाजप नगरसेवकांत धुसफुस वाढली आहे. या पार्श्वभूमीवर कालपर्यंत निवांत असलेल्या भाजप नेत्यांची झोप उडाली आहे. दक्षता म्हणून त्यांनी नगरसेवक आणि नगरसेविकांना सहकुटुंब सहलीवर पाठविले आहे.
महापौर आणि उपमहापौरपदासाठी बुधवारी निवडणूक होणार आहे. १०२ सदस्य असणाऱ्या महापालिकेत भाजप कडे सर्वाधिक ४९ सदस्य आहेत. भाजप विरुध्द शिवसेना, कांग्रेस, राष्ट्रवादी, एमआयएम, वंचित बहुजन आघाडीने एकत्र येऊन नगरसेवकांची जुळवाजुळव सुरू केली आहे. राज्यात सत्तेच्या राजकारणात महाविकास आघाडी स्थापन झाल्याने तोच फार्म्युला सोलापुरात करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
महापौरपदासाठी भाजपकडून श्रीकांचना यन्नम, तर महाविकास आघाडीकडून सारिका पिसे निवडणूक रिंगणात आहेत. १०२ नगरसेवकांपैकी तौफिक शेख यांचे पद रद्द झाल्याने १०१ नगरसेवक मतदानास पात्र आहेत. यापैकी भाजपकडे ४९ नगरसेवक आहेत. सर्व विरोधी सात पक्षांकडे ५२ नगरसेवक आहेत. त्यामुळे सर्व पक्षांनी एकत्रित येण्याचे ठरवले तर भाजपचा पराभव होऊ शकतो.
त्यामुळे भाजपच्या नेते सावध झाले आहेत. ४0 हून अधिक जणांना सहलीला जायचा निरोप देण्यात आला. सायंकाळी पाच वाजता नगरसेविका आणि नगरसेवक भाजप कार्यालयाजवळ जमले होते. काही नगरसेविकांसोबत लहान मुले होती. मनपात भाजपचे बहुमत आहे. इच्छा नसताना सहलीला जावे लागतेय याची खंत अनेकांनी बोलून दाखविली. महापौरपदाच्या उमेदवार श्रीकांचना यन्नम यांच्यासह ३१ जण सहलीला गेले होते. इतर नगरसेवक मंगळवारी रवाना होतील, असे भाजप नेत्यांकडून सांगण्यात आले.