अजित मांडके,
ठाणे - ठाण्याचा प्रथम नागरिक म्हणून विश्वासात न घेता, विषयपत्रिका पटलावर आणलीच कशी, असा सवाल उपस्थित करून प्रशासनाला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना प्रशासनानेच पलटवार करून झालेल्या अपमानाचा बदला घेतला खरा. परंतु, प्रशासन आणि सत्ताधारी, विरोधक यांच्यात रंगलेल्या मानापमानाच्या नाट्यात नगरसेवकांचे नुकसान झाले. पुढील महिन्यात होणारी महासभा शेवटची असेल. त्यानंतर, लागलीच निवडणुकीची आचारसंहिता लागणार असल्याने कामांचे नारळ फोडायचे कसे आणि वचननाम्यात कामे दाखवायची कशी, असा पेच नगरसेवकांना पडला आहे.जानेवारी अथवा फेब्रुवारी महिन्यात ठाणे महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक लागणार आहे. तिची आचारसंहिता डिसेंबरअखेर अथवा जानेवारीच्या पहिल्यादुसऱ्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्यात मागील पाच वर्षांचा अनुभव पाहता निधीचा अभाव, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये रंगलेल्या सत्तेच्या सारीपाटाचा खेळ यामुळे विकासकामे रखडली होती. नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील कामांसाठीदेखील निधी उपलब्ध होऊ शकलेला नाही. परंतु, मागील दोन ते तीन महासभांमध्ये प्रभागातील कामांचा समावेश विषयपत्रिकेत होऊ लागल्याने नगरसेवकांना हायसे वाटत होते. परंतु, काही नगरसेवकांच्या प्रभागातील कामांचा नारळच फुटला नसल्याचीही परिस्थिती आहे. त्यामुळे चालू आणि पुढील महिन्यात त्यांच्या प्रभागातील कामांचा समावेश होईल. शुक्रवारच्या महासभेतदेखील रस्ते, गटारे, पायवाटा, उद्यानांची दुरुस्ती, एलईडी पोल, पार्किंग, आरोग्यविषयक आदींसह इतर महत्त्वाच्या प्रस्तावांचा समावेश होता. महासभा सुरू होताच महापौरांनी सचिवांना दिलेल्या पत्रावरून सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यात मानापमान नाट्य रंगल्याने आयुक्तांनी थेट सर्वच विषय मागे घेतले. त्यामुळे नारळ वाढवण्याच्या तयारीत असलेल्या अनेक नगरसेवकांची यामुळे घोर निराशा झाली आहे. याचे खापर त्यांनी महापौरांवर फोडले आहे. आयुक्तांनी आता हे सर्व विषय पुढील महासभेत घेण्याचे सांगितले आहे. >नारळ फुटणार तरी कधी?पुढील महिन्यात होणारी महासभा ही शेवटची असल्याने त्या वेळेस किती विषय मंजूर होतात, त्यावर स्वाक्षरी होऊन त्यांचे टेंडर केव्हा निघणार, त्या कामांचे नारळ केव्हा फोडणार, असा पेच आता सर्वपक्षीय नगरसेवकांना सतावू लागला आहे. या मानापमानाच्या नाट्यात हाल मात्र ठाणेकरांचे होतील.