मुंबई: शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासह ३५ हून अधिक आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर आठवडाभरापासून राज्यातील राजकीय संघर्ष पराकोटीला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. आठवडभरापासून वेट अँड वॉचच्या भूमिकेत असलेल्या भाजपने अखेर या राजकीय नाट्यात उडी घेत थेट राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना बहुमत चाचणी घेण्यासंदर्भात पत्र दिले. यानंतर आता ३० जून रोजी विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात आले आहे. यातच महाविकास आघाडीच्या बाजूने कोणकोण आहेत, याची चाचपणी सुरू झाली आहे. आमचा पाठिंबा महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारच्या बाजूने असल्याचे माकप नेत्यांनी म्हटले आहे.
भ्रष्ट मार्गाने जमा केलेला प्रचंड पैसा आणि केंद्रीय तपासयंत्रणा यांचा गैरवापर करून महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उलथून टाकण्याचे भाजपचे कारस्थान उघड झाले आहे. या कारस्थानात राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी सामिल असल्याचा आरोप मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने केला आहे. बहुमत चाचणीत पक्षाचे आमदार विनोद निकाले ठाकरे सरकारला पाठिंबा देणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
केंद्रातील भाजपच्या एकाधिकारशाहीला कायम विरोध राहणार
संविधानातील लोकशाही, धर्मनिरपेक्षता आणि संघराज्य प्रणालीचे रक्षण करण्यासाठी, महाराष्ट्राचा सन्मान राखण्यासाठी केंद्रातील भाजपच्या फॅसिस्ट व धर्मांध एकाधिकारशाहीला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष नेहमीच कसून विरोध करत आला आहे आणि यापुढेही करत राहणार. महाविकास आघाडीचे सरकार विधानसभेला सामोरे जाईल तेव्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार कॉ. विनोद निकोले वरील मूल्यांचे रक्षण करण्यासाठी महाविकास आघाडीच्या पाठीशी खंबीरपणे राहून तिच्या सरकारच्या समर्थनार्थ मतदान करतील. तसेच राज्यपालांनी तातडीने बहुमत सिद्ध करण्याचा महाविकास आघाडीला आदेश दिला आहे. हा बहुमत चाचणी करण्याचा आदेश हा संविधानाची हत्या करणारा असल्याचे टीकास्त्र माकपच्या उदय नारकर यांनी सोडले आहे.
दरम्यान, राज्यात घडत असलेल्या या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंना फोन करून मनसेचे एक मत भाजपाला देण्याची विनंती केली आहे. राज ठाकरे यांनी ही मागणी मान्य केल्याचे सांगितले जात आहे. बहुमत चाचणी महाविकास आघाडी सोबतच मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपची कसोटी लागणार आहे. कुठल्याही परिस्थितीत महाविकास आघाडी सरकारला सभागृहात बहुमत नसल्याचे सिद्ध करण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.