राज्यातील ७८ पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना पदक जाहीर; तीन कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 07:48 PM2021-08-14T19:48:38+5:302021-08-14T19:56:33+5:30
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचं कौतुक. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर करण्यात आली यादी.
पोलीस सेवेतील योगदानासाठी महाराष्ट्रातील ७८ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस शौर्य पदक, राष्ट्रपती पोलीस पदक आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठीच्या पदकानं गौरवण्यात येणार आहे. दरम्यान महाराष्ट्रातील पदक विजेत्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले आहे.
“महाराष्ट्र पोलीस दलाचा आम्हाला अभिमान आहे. पोलीस दलाच्या ब्रिद वाक्याला जागून, या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी कर्तव्य बजावून महाराष्ट्राच्या गौरवात भर घातली,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र पोलीस दलातील या अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने देशातील १,३८० पदक विजेत्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची यादी जाहीर केली. यात महाराष्ट्रातील तीन अधिकाऱ्यांनी उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती पोलीस पदक’, २५ अधिकाऱी, कर्मचाऱ्यांनी 'पोलीस शौर्य पदक', तसेच गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ४५ अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘पोलीस पदक’ आणि ११ पोलीस अधिकाऱ्यांनी ‘उत्कृष्ट तपासासाठीचे केंद्रीय गृहमंत्री पदक’ जाहीर झाले आहे. याशिवाय राज्याच्या अग्निशमन दलातील आठ अग्निशमन अधिकारी, कर्मचाऱ्यांना 'अग्निशमन सेवा शौर्य पदक' जाहीर झाले आहे.
उपमुख्यमंत्र्यांकडूनही अभिनंदन
राष्ट्रपती पोलीस पदक, पोलीस शौर्यपदक, गुणवत्तापूर्ण सेवापदक जाहीर झालेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील ७८ अधिकारी व कर्मचाऱ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केलं आहे. कायदा-सुव्यवस्था, गुप्तवार्ता, गुन्ह्यांचा तपास, आपत्कालीन परिस्थितीतील मदतकार्य, नागरिकांशी संवाद-सौहार्द अशा अनेक आघाड्यांवर जगातील सर्वोत्कृष्ट पोलीस दलांपैकी असलेल्या महाराष्ट्र पोलिसांनी त्यांची क्षमता, गुणवत्ता, दर्जा पुन्हा एकदा सिद्ध केला आहे. पदकविजेत्या पोलिसांचा राज्याला अभिमान आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी सर्वांचं कौतुक केलं असून यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. उल्लेखनीय सेवेबद्दल अग्निशमनसेवा शौर्यपदक विजेत्या राज्यातील आठ अग्निशमन अधिकारी-कर्मचाऱ्यांचेही उपमुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केलं आहे.