मुंबई - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेचा तिसरा टप्पा सुरू आहे. ही यात्रा नुकतीच पुण्यातून गेली. यावेळी पुण्यातील मुख्यमंत्र्यांची यात्रा ही नेत्यांच्या बॅनरबाजीमुळेच अधिक गाजल्याचे दिसून आले. मुख्यमंत्र्यांनी देखील बॅनरबाजीमुळे तिकीट मिळत नसते, असा सूचक इशारा दिला. परंतु, मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवर पुण्यातील काही बॅनरचे फोटो शेअर करण्यात आले. त्यात नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्या बॅनरला स्थान मिळाले. त्यामुळे मोहोळांनी बॅनरबाजीत प्रतिस्पर्धी असलेल्या मेधा कुलकर्णींना शह दिल्याची चर्चा येथे सुरू आहे.
पुण्यातील कोथरूड मतदार संघात बॅनर लावण्यावरून आमदार मेधा कुलकर्णी आणि त्यांचे प्रतिस्पर्धी मुरलीधर मोहोळ यांच्या कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली होती. एवढच काय तर उभय नेत्यांचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती. परंतु, कुलकर्णी आणि मोहोळ याच्या लढाईत मोहोळ यांनी बाजी मारल्याचे दिसून आले.
मोहोळ यांनी लावलेले बॅनर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही भावले असून त्यांच्या बॅनरला थेट मुख्यमंत्र्यांच्या ट्विटर हँडलवर स्थान मिळाले आहे. एवढच नाही, तर मुख्यमंत्र्यांनी पुण्यातील कल्पकतेच कौतुकही केलं आहे. यामुळे मोहोळ यांनी मुख्यमंत्र्यांच्या नजरेत स्थान निर्माण केल्याची चर्चा पुण्यात सुरू आहे. एकूणच यामुळे विधानसभेच्या उमेदवारीसाठी कुलकर्णी आणि मोहोळ यांच्यातील चुरस आणखी वाढणार असं दिसत आहे.
मेहेंदळे गॅरेज चौकात महाजनादेश यात्रेचे होर्डिंग लावण्याच्या वादातून कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी आणि मोहोळ यांच्या कार्यकर्त्यात जुंपली होती. कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. एकमेकांचे मोबाइल फोडणे, कानशिलात मारणे, डोके फोडणे इथपर्यंत कार्यकर्ते भिडले. वादानंतर दोन्ही बाजूंनी शांत राहणेच पसंत केले होते.