प्रश्न : गोपीनाथ मुंडे यांच्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष पद मराठवाड्यात आपल्याकडे आले आहे. प्रदेशाध्यक्ष म्हणून आपल्यासमोर कोणती आव्हाने आहेत?उत्तर : माझ्यासमोर आव्हान असे कोणतेच नाही; परंतु महाराष्ट्रातून भाजपाचे १ कोटी सदस्य करण्याची कामगिरी मला करावी लागणार आहे. केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये आमचे सरकार असल्यामुळे पक्षसंघटनेसमोर फारसे आव्हान नाही. पक्षात कुरबूर नाही, त्यामुळे सरकारचे लोकाभिमुख निर्णय शेवटच्या माणसापर्यंत कसे पोहोचवता येतील ही जबाबदारी आहे. नव्या सरकारकडून लोकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी सामान्य माणूस आणि सरकार यांच्या मधील दुवा ही माझी भूमिका असेल. प्रश्न : मंत्रीपद सोडून संघटनेचे पद स्वीकारण्यास फारसे कोणी तयार नसताना आपण ही जबाबदारी का घेतली?उत्तर : गेली ३७ वर्षे मी संघटनेत काम करतो आहे. सुरुवातीला माझ्या गावच्या शाखेचा अध्यक्ष होतो. आता राज्याचा अध्यक्ष झालो आहे. माझा मूळ पिंड संघटनेतच काम करण्याचा आहे. याच्या मागची थोडी गोष्ट सांगतो, संसदेचे कामकाज एक दिवस विसर्जित झाले. पंतप्रधान मोदी यांना भेटण्यासाठी आमच्या पक्षाच्या खासदारांनी गराडा घातला. या गर्दीत काय भेट घ्यावी म्हणून मी बाहेर जाणाऱ्या मार्गावर उभा राहिलो. मोदींनी बाहेर पडताना माझ्याकडे बघितले आणि ‘दो दिन के बाद आ के मिलना’ असे सांगितले. खरे म्हणजे आपल्याला पंतप्रधानांनी कशाला बोलावले, याचाच विचार मी दोेन दिवस करीत होतो. या दरम्यान, पंतप्रधान नेपाळच्या दौऱ्यावर गेले होते. यानंतर मी पक्षाध्यक्ष अमित शाह आणि केंद्रीय मंत्री गडकरी यांची भेट घेतली. नंतर दोन दिवसांनी पंतप्रधानांची भेट घेतली. पंतप्रधानांनी माझ्यासमोर ४० मिनिटांत अख्खा महाराष्ट्र माझ्यासमोर उभा केला. ते म्हणाले, मला तुमची आता महाराष्ट्रात आवश्यकता आहे; परंतु तुम्हाला मंत्री म्हणून केंद्रात राहायचे असेल तर मी तुमच्यावर माझा निर्णय लादणार नाही. प्रदेशाध्यक्षपद की मंत्रीपद हा निर्णय तुम्हालाच करायचा आहे. त्यावेळेस मी त्यांना माझा निर्णय स्पष्ट कळविला आणि ही नवीन जबाबदारी स्वीकारली. याबाबत काही उलटसुलट चर्चा असली तरी वस्तुस्थिती अशी आहे.प्रश्न : एक कोटीचे आव्हान कसे पेलणार?उत्तर : ‘शत-प्रतिशत भाजपा’ हे आमचे धोरण आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्त्यांना कामाला लावणार आहोत.प्रश्न : मग महायुतीतील इतर घटक पक्षांचे काय?उत्तर : महायुतीतील पक्षांचा विचार आम्ही का करायचा? आमची त्यांच्याशी झालेली युती ही निवडणुकीपुरती आहे आणि ती केवळ सरकार बनविण्याच्या उद्देशाने केलेली; परंतु या युतीतील प्रत्येक पक्ष आपल्या पक्षाचा विस्तार करण्यास मुख्त्यार आहे. त्यामुळे आम्ही जसे आमच्या पक्षाच्या विस्ताराचा विचार करू शकतो, तसे आमचे मित्रपक्षही तसा विचार करू शकतात. त्यांना वाढविण्याची जबाबदारी काही आमची नाही. प्रश्न : सत्तेवर येण्यापूर्वी भाजपाने महाराष्ट्र टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते; परंतु खारघरचा नवीन टोल सुरू करून या आश्वासनाला हरताळ फासला गेला. त्याचे काय?उत्तर : मुळात खारघर रस्ता प्रकल्प हा आघाडीच्या काळातील आहे. त्याचा निर्णय, त्याची अंमलबजावणी ही काँग्रेसच्या राजवटीतच झाली आणि त्यानुसार टोल फक्त आता सुरू झाला. त्यामुळे या निर्णयाशी आम्हाला काही घेणे-देणे नाही. काही टोल बंद करण्याचा आम्ही प्रयत्न करीत आहोत, त्याची समीक्षा चालू आहे. कंत्राटदारांचे पैसे परत करण्याचे नियोजन करावे लागेल. त्यानंतर टोलमुक्तीचा निर्णय घेतला जाईल. आमच्या कामगिरीचे विचाराल तर अजून अर्थसंकल्पीय अधिवेशन झाले नाही. आम्ही सात हजार कोटींचे पॅकेज शेतकऱ्यांना दिले. तुलनाच करायची झाली तर केंद्रातील पूर्वीच्या पुलोआ सरकारने १५ वर्षांत साडेआठ हजार कोटींचे पॅकेज देशातील शेतकऱ्यांना दिले होते; आम्ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी सात हजार कोटींचे पॅकेज दिले आहे.प्रश्न : लोकसभेनंतर ज्या काही विधानसभा निवडणुका झाल्या, त्यापैकी छत्तीसगढ वगळता महाराष्ट्र किंवा काश्मीर या दोन मोठ्या राज्यांमध्ये बहुमत मिळाले नाही. याचा अर्थ लोकसभेचा प्रभाव ओसरला, असा घ्यायचा का?उत्तर : महाराष्ट्रात आम्ही चौथ्या क्रमांकावर होतो, आता क्रमांक एकवर आलो. युती तुटली नसती तर स्वबळावर सरकार बनविण्याची ताकद उभी राहिली असती. कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळेच आम्ही यावेळी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला होता. काश्मिरात पहिल्या क्रमांकावर असलो तरी मतांच्या आकडेवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहोत, याचा अर्थ तुम्हीच काय तो लावा.प्रश्न : महाराष्ट्रात आता नवी मुंबई, औरंगाबाद अशा महानगरपालिका निवडणुका आहेत, यात तुम्ही स्वतंत्र लढणार का?उत्तर : या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कशा लढायच्या याचा निर्णय स्थानिक शाखा घेतील. त्यांना जर स्वतंत्र लढायचे असेल तर तसा तो निर्णय घेतील; तरीही युती व्हावी असा आमचा प्रयत्न असेल.प्रश्न : संघाचे भाजपावर वर्चस्व किती आहे?उत्तर : वर्चस्व कसले? आता तुमच्यासमोर तर मी शाखेच्या गणवेशातच बसलो आहे. त्यामुळे हे वर्चस्व वगैरे काही नाही.प्रश्न : तुम्ही आता राज्याचे नेते आहात. मराठवाड्याचा नेता कोण असेल?उत्तर : नेता असा कोणी सांगून होत नसतो आणि कुणी म्हटल्यानेही होत नसतो. नेता हा लोकांमध्ये घडतो, त्यामुळे माझ्या दृष्टीने हा प्रश्न फारसा महत्त्वाचा नाही. पक्षात माझ्यासाठी सगळेच सारखे आहेत.
प्रसारमाध्यमे राईचा पर्वत करतात
By admin | Published: January 15, 2015 4:57 AM