मुंबई- पत्रकारांना पुरस्कार मिळणे ही दुर्मीळ गोष्ट आहे. त्यात या पुरस्कारासाठी माझी निवड करण्यात आली त्याबद्दल जाएंट्सविषयी कृतज्ञता व्यक्त करतो आणि आनंदाने त्याचा स्वीकार करतो. पत्रकारिता क्षेत्रात अत्यंत जबाबदारीने काम करावे लागते. या पुरस्कारामुळे ही जबाबदारी अधिकच वाढली याची मला जाणीव आहे. विशेषत: सध्याच्या राजकीय परिस्थितीत पत्रकारांना काम करणे अधिक आव्हानात्मक आहे. गेल्या काही वर्षांपासून पत्रकारितेतील व्यावहारिकता अधिक वाढते आहे, या व्यावहारिकतेला पत्रकारांनी आणि वृत्तपत्रांनी वेळीच विरोध केला पाहिजे. व्यावसायिकता वाढीवर सरकारने अंकुश लावण्याचा धोका निर्माण होऊ नये यासाठी आपणच दक्ष राहिले पाहिजे. पत्रकारिता क्षेत्रात स्पर्धा असावी मात्र ती निकोप असायला हवी, असे प्रतिपादन लोकमत मीडियाचे चेअरमन विजय दर्डा यांनी केले.जाएंट्स इंटरनॅशनलतर्फे आयोजित ४४ व्या जाएंट्स पुरस्कार सोहळ्यात पत्रकारितेच्या क्षेत्रातील मोलाच्या योगदानाबद्दल विजय दर्डा यांना प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना दर्डा म्हणाले की, माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याची धुरा अत्यंत समर्थपणे सांभाळली होती.त्यांनी या खात्याला नवी दिशा देण्याचे प्रयत्न केले होते. आता केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याचे रुपडे पालटण्याचे काम प्रकाश जावडेकर करीत आहेत. या खात्याचे जे भगवेकरण झाले होते ते बदलण्याचे काम जावडेकर यांनी केले आहे. यापूर्वी पर्यावरण खातेही त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने हाताळले आहे, असे गौरवोद्गारही दर्डा यांनी काढले. दिशाहीन होत चाललेला केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याचा कारभार जावडेकरांच्या हातात आल्यापासून या खात्याची इमेज बदलल्याचे त्यांनी अधोरेखित केले. मीडियाने आपली लक्ष्मणरेषा स्वत:च आखून घ्यावी, तसे झाले नाही तर त्यात सरकारचा हस्तक्षेप होण्याची भीती आहे. तो संभाव्य हस्तक्षेप टाळण्यासाठी आधीच दक्षता घेण्याची गरज आहे, असे प्रतिपादनही या वेळेस विजय दर्डा यांनी केले. त्यांच्या या भूमिकेचा उल्लेख केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर, दीपक चौरसिया, ऋषी कपूर आणि दीपिका पदुकोण यांनीही आपल्या भाषणात केला.ऋषी कपूर आपल्या भाषणात म्हणाले, दर्डा यांनी मीडियाबद्दल जी भूमिका मांडली ती वास्तव आहे, मी स्वत: मीडियाचा बळी आहे. माझ्यावरही मीडियाने अन्याय केला आहे.दीपिका पदुकोण म्हणाल्या, आमच्याबद्दलचे गॉसिप छापले जाते मात्र मी ज्या ह्यद लिव्ह, लव्ह, लॉफ फाऊन्डेशनह्णच्या माध्यमातून सामाजिक कार्य करते त्याच्या बातम्या कोणी छापत नाही.
मीडियाने स्वत:च लक्ष्मणरेषा आखून घ्यावी - विजय दर्डा
By admin | Published: September 19, 2016 4:43 AM