पुणे : देवस्थाने ही केवळ कर्मकांड करण्याची ठिकाणे न राहता त्यांनी लोकप्रबोधनाचे काम करून विकासात सहकार्य देणे अपेक्षित आहे. त्यामुळेच देवस्थानांच्या मदतीने राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा सरकारचा प्रयत्न असून, तो प्रत्यक्षात आणण्याची प्राथमिक कार्यवाही सुरू झाली आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे सांगितले.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने बी.जे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयात रुग्णांच्या नातेवाइकांसाठी सुरू करण्यात आलेल्या विश्रामगृह, स्त्रीरोग व प्रसूतीशास्त्र विभाग व कॅथलॅब सुविधा अशा तीन रुग्णोपयोगी उपक्रमांचे लोकार्पण केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.फडणवीस म्हणाले, ‘‘वैद्यकीय सुविधांच्या बाबतीत राज्य आघाडीवर असावे असाच आमचा प्रयत्न आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालये कमी आहेत, डॉक्टरांची संख्या अपुरी आहे, ग्रामीण भागात चांगल्या सुविधा नसल्यामुळे तिथे काम करण्यास डॉक्टर तयार होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मात्र फक्त सरकारी स्तरावर त्यात अद्ययावत बदल करणे अवघड आहे, त्यासाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचा प्रयोग राबवण्याचा प्रयत्न आहे. यात देवस्थानांच्या आर्थिक सहयोगातून प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याला प्राधान्य देण्यात येईल. जनतेने श्रद्धापूर्वक अर्पण केलेला पैसा जनतेच्याच कामी कसा आणायचा याचा आदर्शच दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टने घालून दिला आहे, अशा शब्दांत फडणवीस यांनी दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या या उपक्रमाचे कौतुक केले. पालकमंत्री गिरीश बापट, शालेय व वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे, गृहराज्यमंत्री राम शिंदे, समाजकल्याण राज्यमंत्री दिलीप कांबळे, जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महापौर दत्तात्रय धनकवडे, खासदार अनिल शिरोळे व श्रीरंग बारणे, गणेश मंडळाचे अध्यक्ष अशोकराव गोडसे, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले आदी या वेळी उपस्थित होते. (प्रतिनिधी)कॅन्सरसाठीही स्वतंत्र विभागट्रस्टने ससूनमध्ये सुरू केली तशी रुग्णसेवा सार्वजनिक विश्वस्त संस्थांच्या मदतीने राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील वैद्यकीय महाविद्यालयात सुरू केली जाईल, असे तावडे यांनी सांगितले. ससूनमध्ये कॅन्सरवरील उपचारांची सुविधा नाही. त्यासाठी एक स्वतंत्र विभागच सुरू करण्याचा प्रयत्न असून, त्यासाठी सरकार जागा मिळवत आहे, असे ते म्हणाले. पालकमंत्री बापट यांनी सरकारकडून ट्रस्टच्या माध्यमातून सुरू झालेल्या रुग्णसेवा उपक्रमाला सरकारकडून सर्व प्रकारची मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले.
देवस्थानांच्या मदतीने प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज
By admin | Published: August 09, 2015 4:09 AM