वैद्यकीय महाविद्यालयांमधील रिक्त पदे तीन महिन्यांत भरणारघाटी रुग्णालयाच्या सर्व समस्या सोडविणारमुंबई : औरंगाबादसह राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळांमधील रिक्त पदे येत्या तीन महिन्यांत भरण्यात येतील, अशी ग्वाही वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी शनिवारी विधानसभेत दिली. या इस्पितळांमध्ये मोफत औषधे येत्या चार आठवड्यात उपलब्ध करून देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.औरंगाबादच्या घाटी इस्पितळाबाबतची लक्षवेधी सूचना शिवसेनेचे आर. एम. वाणी यांनी मांडली होती. रवींद्र वायकर, काँग्रेसचे डॉ. कल्याण काळे यांनी उपप्रश्न उपस्थित केले. वाणी यांनी ज्या ज्या समस्या मांडल्या त्या सर्व दूर करण्यात येतील, असे आव्हाड म्हणाले. घाटी रुग्णालयात औषधींचा तुटवडा आहे, मनोरुग्णांचे हाल होतात, श्वानदंशावरील लसीची कमतरता आहे, १५७ पदे रिक्त आहेत, रुग्णवाहिकांची कमतरता आहे, असे वाणी यांनी सांगितले. हाफकिन या लस निर्मिती करणार्या संस्थेच्या अडचणींचा पाढा वाचत बसण्यापेक्षा लसींचा तुटवडा भासणार नाही याकडे लक्ष दिले जाईल, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले. श्वानदंशाची लस घाटी रुग्णालयात पुरेशी उपलब्ध आहे, सर्पदंशाच्या लसीचा तुटवडा आहे. त्यामुळे महापालिकेकडून वा बाजारातून ती खरेदी केली जाते. बारुग्ण विभागात नवीन एक्स-रे मशीन येत्या दोन आठवड्यात कार्यान्वित होईल. सर्जिकल इमारतीमध्ये दोन एक्स-रे सुरू असून, आणखी तीन यंत्रे बसविण्याचे काम दोन आठवड्यांत पूर्ण होईल. सदर रुग्णालयात डॉक्टरांची मंजूर पदे ३११ असून, त्यातील रिक्त ८२ पदे भरण्याची प्रक्रिया प्रगतीपथावर आहे, असे आव्हाड यांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)
वैद्यकीय महाविद्यालयांमधील रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार
By admin | Published: June 07, 2014 10:00 PM