डीएमईआरच्या हालचाली : नवीन तारखेची लवकरच घोषणा नागपूर : वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी लवकरच प्रवेश प्रक्रिया सुरू होण्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाने (डीएमईआर) प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात फेरबदल करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. या बदलानंतर कौन्सिलिंग प्रक्रिया जुलै-ऑगस्टऐवजी जून महिन्यात सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवाय ती जून महिन्याच्या तिसर्या आठवड्यापर्यंत पूर्ण होणार आहे. पहिल्या टप्प्यातील प्रक्रियेनंतर विद्यार्थ्यांंना वाटप झालेल्या महाविद्यालयांत लगेच प्रवेश निश्चित करावा लागेल; शिवाय त्यानंतर रिक्त जागांसाठी दुसरी फेरी घेण्यात येईल. माहिती सूत्रानुसार, डीएमईआर सोमवारपर्यंत सुधारित वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. यासाठी डीएमईआरचे अधिकारी दिवस-रात्र प्रयत्न करीत आहेत. विशेष म्हणजे, यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वाचा आदेश जारी केला आहे. यात मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियासह वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया आयोजित सर्व राज्यातील संबंधित यंत्रणांना प्रवेश प्रक्रियेचा कार्यक्रम निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. यानुसार मे महिन्यात कौन्सिलिंग प्रक्रिया सुरू करून, जून महिन्यात निकाल जाहीर करणे आवश्यक होते. शिवाय २५ जूनपर्यंंत पहिल्या फेरीतील प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे अपेक्षित होते. त्यामुळे डीएमईआर सुधारित वेळापत्रक तयार करण्याच्या कामाला लागले असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)अन्यथा न्यायालयाचा अवमान सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात प्रवेश प्रक्रियेला कोणताही विलंब होऊ नये, असे सांगितले आहे. तसेच निश्चित कार्यक्रमानुसारच प्रवेश प्रक्रिया पूर्ण व्हावी; अन्यथा तो न्यायालयाचा अवमान समजल्या जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
मेडिकल कौन्सिलिंगच्या वेळापत्रकात फेरबदल!
By admin | Published: June 06, 2014 12:51 AM