मुंबई : ‘नीट’ परीक्षेपासून वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशासाठी महाराष्ट्रात सुरू झालेला गोंधळ अखेर संपला आहे. विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांची यादी मंगळवार, १ आॅगस्ट रोजी जाहीर करण्यात येणार आहे. राज्यातील ३०० खासगी वैद्यकीय महाविद्यालयांनी शुल्काच्या प्रश्नावरून प्रवेश प्रक्रियेतून माघार घेतली होती. सोमवारी झालेल्या बैठकीत खासगी वैद्यकीय महाविद्यालय संस्थाचालकांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांनी दिली.सोमवारी वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, संचालक डॉ. शिनगारे यांच्यासह वैद्यकीय महाविद्यालयांच्या संस्थाचालकांची बैठक झाली. या वेळी संस्थाचालकांनी नेमून दिलेले शुल्क कमी वाटत असल्यामुळे प्रवेश प्रक्रियेतून बाहेर पडल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर या विषयावर सविस्तर चर्चा झाली. त्या वेळी खासगी वैद्यकीय महाविद्यालयांची पुन्हा एकदा शिक्षण शुल्क समितीबरोबर बैठकहोणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर संस्थाचालकांनी वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला. मंगळवारी या महाविद्यालयांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. प्रवेशाचा तिढा सुटल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
वैद्यकीय अभ्यासक्रम प्रवेशाचा तिढा सुटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 5:17 AM