लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : आजारांशी लढायचे असेल तर सर्व वैद्यकीय शास्त्रांमधील डॉक्टरांमध्ये सुसंवाद असणे आणि उपचारपद्धतींचा आदर करणे गरजेचे आहे. त्यासाठी वैद्यकीय अभ्यासक्रमामध्ये संवादकौशल्याचा समावेश केला जाणार आहे. आगामी काळात वैद्यकीय शिक्षण सर्वसामान्यांना परवडणारे, सहज उपलब्ध होणारे आणि जनकेंद्रित केले जाईल, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याणमंत्री जे. पी. नड्डा यांनी केले. भविष्यात दीड लाख प्राथमिक आरोग्य केंद्रे स्वास्थ्य केंद्रांमध्ये रुपांतरित करण्याचे सूतोवाचही त्यांनी केले.सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या आरोग्य आणि जीववैद्यकीय विभागातर्फे आयोजित जागतिकीकरणावरील आरोग्य सेवेवर आधारित आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन नड्डा यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. या वेळी सिंबायोसिसचे आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार, प्रधान संचालिका डॉ. विद्या येरवडेकर, कुलगुरु डॉ. रजनी गुप्ते, डॉ. राजीव येरवडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. अॅलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेद अशा प्रत्येक वैद्यकीय शास्त्राची आपापली खासियत तसेच जमेच्या बाजू आहेत. सर्व शास्त्रांनी एकत्रितपणे आणि परस्परपूरक काम करावे लागेल. इंडियन कौैन्सिल फॉर मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) मध्ये अस्थिरोगशास्त्र आणि अक्युपंक्चर या शाखांचा समावेश करण्याची भूमिकाही घेण्यात आली. कोणत्याही आजाराच्या जीवाणू वा विषाणूला मर्यादा नसतात. मग, उपचारपद्धतींमध्ये तरी भिंती का उभ्या करायच्या, असा सवाल त्यांनी केला. पूर्वीचे आरोग्यविषयक धोरण व्याधीकेंद्रित होते. नवे आरोग्यविषयक धोरण रोगाकडून निरोगाकडे जाणारे, प्रतिबंधात्मक आणि प्रोत्साहित करणारे आहे. आरोग्य सार्वभौम आणि सर्वसमावेश करण्याचा प्रयत्न सुुरू आहे. सर्व मंत्रालयांनी परस्परसहकार्याने काम केल्यास आरोग्य मंत्रालयाचा ताण कमी होऊ शकेल. वृद्धांची काळजी, मरणासन्न रुग्णांची देखभाल आणि रुग्णांचे पुनर्वसन यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. उच्च रक्तदाब, स्तनांचा कर्करोग आदी आजारांसाठी मोठ्या प्रमाणात तपासण्या केल्या जाणार आहेत. आरोग्यविषयक धोरणामध्ये बदलती जीवनशैली, आहार, कामाच्या ठिकाणचा ताण आदी बाबींचा बारकाईने विचार करण्यात आला आहे.- जे. पी. नड्डाकेंद्रीय आरोग्य, कुटुंबकल्याणमंत्रीवैद्यकीय शिक्षणाचे स्वरुप अत्यंत महागडे आहे. भारतीय वैद्यक परिषदेतील भ्रष्टाचार पाहता, वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा सिंबायोसिसने कधीही विचार केला नाही. वैद्यकीय शिक्षणामध्ये सुधारणांची आणि अभ्यासक्रमाचा कालावधी कमी करण्याची गरज आहे. जुनी फॅमिली डॉक्टर संकल्पना पुनरुज्जीवित करण्यासाठी आणि परिचारिकांना डॉक्टरयोग्य बनवण्यासाठी अभ्यासक्रम उपलब्ध करणे आवश्यक आहे. याबाबतचे धोरण बदलेल, असे आश्वासन आरोग्यमंत्र्यांकडून मिळाले़- डॉ. शां़ ब़ मुजुमदार, डॉक्टरांनी रुग्णांना जेनेरिक औषधे लिहून देण्याबाबत शासनातर्फे सूचना देण्यात आल्या आहेत. जेनेरिक औषधांमध्ये सध्या एकत्रीकरण उपलब्ध नाही. मात्र, त्यासंदर्भात ठोस पावले उचलण्यात आली असून, भविष्यात जेनेरिक औषधांचा मार्ग सुकर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे आश्वासन जे. पी. नड्डा यांनी दिले.
वैद्यकीय शिक्षण जनकेंद्री व्हावे
By admin | Published: May 06, 2017 2:31 AM