संतोष वानखडे ल्ल वाशिममहाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना आता मुलाखतीपूर्वीच वैद्यकीय तपासणीला सामोरे जावे लागणार आहे. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर मुलाखतीला जातानाच उमेदवारांना शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सोबत न्यावे लागणार आहे. यापूर्वी अंतिम निवड झाल्यानंतरच उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जायची.राज्यस्तरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वर्ग एक, दोन व तीनच्या अधिकाऱ्यांची निवड केली जाते. त्यासाठी पूर्व, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा तीन टप्प्यांतून उमेदवारांची निवड केली जाते. निवड झाल्यानंतर उमेदवार शारीरिकदृष्ट्या सक्षम आहे की नाही, याची खात्री म्हणून उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जाते. २०१४ पर्यंत अंतिम निवड झाल्यानंतरच उमेदवारांची वैद्यकीय तपासणी केली जात होती. आता २0१५ या नववर्षापासून निवड प्रक्रीयेमध्ये महत्वाचे फेरबदल करण्यात आले आहेत. त्यानुसार मुख्य परीक्षा उत्तीर्ण होऊन मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना वैद्यकीय तपासणीचे प्रमाणपत्र मुलाखतीपूर्वीच सादर करणे सामान्य प्रशासन विभागाने सक्तीचे केले आहे. हे प्रमाणपत्र नसल्यास उमेदवाराला मुलाखत देता येणार नाही. त्यामुळे मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना सक्षम वैद्यकीय प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र घेणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)५ जानेवारीपासून मुलाखती सुरूमहाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सुमारे ३८० पदांसाठी गतवर्षी जाहिरात प्रसिद्ध केली होती. पूर्व आणि मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या सुमारे एक हजार ३६७ उमेदवारांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुलाखतीसाठी निवड केली आहे. ५ जानेवारीपासून मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद या केंद्रांवर मुलाखती सुरू झाल्या आहेत.
आता मुलाखतीपूर्वीच वैद्यकीय तपासणी
By admin | Published: January 09, 2015 1:18 AM