ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 22- वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ग्रंथालयासाठी खरेदी केलेल्या नियतकालिकांच्या किंमतीने स्थायी समितीच्या तोंडाला फेस आणला आहे़ मूळ किंमतीपेक्षा चार ते दहापट अधिक किंमत लावून या नियतकालिकांची खरेदी केल्याचा आरोप मनसेने केला आहे़ त्यामुळे या खरेदीची चौकशी करण्याचा निर्णय स्थायी समितीने आज घेतला़पालिका अधिनियम ७२ (२) अन्वये पालिका आयुक्त ५० ते ७५ लाख रुपयांपर्यंतचा खर्च आपल्या अधिकारात करु शकतात़ मात्र यामध्ये एका नियतकालिकाची किमान किंमत पाच ते आठ लाख रुपये दाखविण्यात आली आहे़ बाजारात या पुस्तकांची किंमत ७५ हजार रुपयांपर्यंत असल्याने या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी केला़ या वैद्यकीय पुस्तकांच्या मूळ किंमतीसह यादी सादर करण्याची सुचनाही स्थायी समितीने केली होती़ मात्र या किंमतीमध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आढळून आली़ दोन कोटी रुपयांमध्ये खरेदी केलेली ही पुस्तकं कोणती, असा सवाल सदस्यांनी केला़ परंतु याबाबत प्रशासनाकडे समाधानकारक उत्तर नसल्याने अखेर स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी प्रशासनाला चौकशीचे आदेश दिले आहेत.या खरेदी अंतर्गत केईएम रुग्णालयासाठी २५ एप्रिल रोजी प्रमुख रुग्णालयाच्या संचालकांनी खरेदी केलेली नियतकालिके तब्बल पाच लाख ५८ हजार रुपये एवढ्या किंमतीची होती़. दुसरी नियतकालिकेची किंमत सहा लाख ६२ हजार रुपये होती, तर अन्य दोन नियतकालिांची प्रत्येकी आठ लाख ५४ हजार रुपये किंमत होती़. या नियतकालिका वैद्यकीय शाखेचे विद्यार्थी आणि प्राध्यापक यांच्यासाठी खरेदी करण्यात आल्या आहेत़ यासाठी दोन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.