सोलापूर : वैद्यकीय प्रवेशप्रक्रियेमधील केंद्रीय कोट्यातील २२२ जागा या महाराष्ट्र राज्याच्या कोट्यात वर्ग करण्यात आल्या आहेत. यंदा देशभरात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढली असल्याने केंद्रीय कोट्यातील जागा रिक्त राहिल्या आहेत. या जागा वर्ग करण्यात आल्यामुळे राज्यातील अधिक विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश घेण्याची संधी मिळाली आहे.राज्यातील सरकारी आणि महापालिकेकडून चालविण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयातील जवळपास सर्व जागा या पहिल्या आणि दुसऱ्या फेरीनंतर भरल्या आहेत. काही पात्र असणाऱ्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही, तर काहींनी प्रवेश रद्द करून त्यांच्या राज्यात असणाऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. त्यामुळे केंद्रीय कोट्यातील २२२ जागांवर राज्यातील विद्यार्थ्यांना डॉक्टर बनण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. एमबीबीएससोबतच दंतवैद्यकीय अभ्यासक्रमाच्या चार महाविद्यालयांतील ४० जागाही राज्य कोट्याकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. सर्वांत जास्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालये महाराष्ट्रात आहेत. आता इतर राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढली. त्यामुळे त्या राज्यातील पात्र विद्यार्थ्यांनी त्यांच्याच राज्यात प्रवेश घेण्याचा पर्याय निवडला.
मेडिकलच्या जागा २२२ने वाढल्या
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 3:57 AM