ठाणे : ठाणे महापालिकेच्या महापौरपदाची सूत्रे अखेर स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या शिवसेनेच्या हाती आली असून भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या उमेदवारांनीदेखील आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे महापौरपदी मीनाक्षी शिंदे आणि उपमहापौरपदी रमाकांत मढवी यांची बिनविरोध निवड झाली. या वेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हजेरी लावली होती. ठाणे महापालिकेच्या सातव्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवसेनेला ६७, राष्ट्रवादीला ३४, भाजपाला २३, काँग्रेसला ३, एमआयएम २, अपक्ष २ असे १३१ नगरसेवक निवडून आले होते. महापालिकेत पुन्हा एकदा सत्तेची सूत्रे शिवसेनेच्या हाती आली. ठाणेकरांनी पहिल्यांदाच शिवसेनेच्या बाजूने स्पष्ट कौल दिला. दरम्यान, महापौरपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेनेकडून मीनाक्षी शिंदे यांनी अर्ज भरला होता. तर, भाजपाकडून आशादेवी सिंग, राष्ट्रवादीतर्फे अशरीन राऊत यांनी अर्ज भरले होते. उपमहापौरपदासाठी शिवसेनेच्या वतीने रमाकांत मढवी, भाजपाकडून मुकेश मोकाशी, राष्ट्रवादीतर्फे आरती गायकवाड आणि काँग्रेसतर्फे विक्रांत चव्हाण यांनी अर्ज दाखल केला होता. त्यानुसार, सोमवारी महापौरपदाची निवडणूक पार पडली. या वेळी पीठासीन अधिकारी म्हणून जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी काम पाहिले. या वेळी महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीतून अपेक्षेप्रमाणे भाजपा, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने माघार घेतल्याने ही निवडणूक बिनविरोध झाली. त्यानुसार, महापौरपदी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे, उपमहापौरपदी रमाकांत मढवी यांची बिनविरोध निवड झाली.या वेळी झालेल्या विशेष महासभेत सत्ताधारी पक्षातील नगरसेवकांसह विरोधी पक्षातील नगरसेवकांनीदेखील मीनाक्षी शिंदे यांचे कौतुक केले. या वेळी सभागृहात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे आदींनीदेखील उपस्थिती लावून महापौर आणि उपमहापौरांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर, जुन्या ठाण्यातून विजयी मिरवणूक काढण्यात आली. (प्रतिनिधी) निष्ठावानांना न्यायघोडबंदर भागाला प्रथमच महापौरपद मिळाले असून यापूर्वी भालचंद्र तांगडी आणि नरेश मणेरा यांना उपमहापौरपद मिळाले होते. परंतु, त्यानंतर प्रथमच निष्ठावान शिवसैनिकांना न्याय देऊन महापौर आणि उपमहापौरपद मिळाले आहे. दिव्यालादेखील प्रथमच न्याय देताना उपमहापौरपद मिळाले आहे.
मीनाक्षी शिंदे महापौर, तर रमाकांत मढवी उपमहापौर
By admin | Published: March 07, 2017 4:55 AM