ऑनलाइन लोकमत
ठाणे, दि. 6 - ठाण्याच्या महापौरपदी शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांची निवड झाली आहे. भाजपापाठोपाठ राष्ट्रवादीनेही महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेतल्यामुळे शिवसेनेच्या मीनाक्षी शिंदे यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक सध्या केवळ औपचारिकता असून फक्त अधिकृत घोषणा होणं बाकी आहे.महापौरपदासाठी शिवसेनेतर्फे मीनाक्षी शिंदे तर उपमहापौरपदासाठी रमाकांत मढवी यांनी अर्ज दाखल केला होता.
मुंबई महापौर निवडणुकीपाठोपाठ भाजपाने ठाण्यातही महापौरपदाच्या शर्यतीतून माघार घेतली. त्यामुळे ठाण्यातही शिवसेनेचा महापौर बसण्याचा मार्ग मोकळा झाला होता. वरिष्ठ नेत्यांच्या आदेशामुळे उमेदवारी अर्ज मागे घेत असल्याचे ठाणे भाजपाचे अध्यक्ष संदीप लेले यांनी सांगितले. त्यानंतर भाजपकडून आशा सिंह आणि मुकेश मोकाशी यांनी भरलेला अर्ज मागे घेतला.
महापौरपदाच्या शर्यतीत असलेल्या राष्ट्रवादीनेही भाजपापाठोपाठ माघार घेतली. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध झाली आहे.
ठाण्यात 131 पैकी 67 जागा मिळवत शिवसेनेनं वर्चस्व मिळवलं आहे, तर राष्ट्रवादीच्या 34 आणि भाजपच्या 23 जागा निवडून आल्या आहेत.
Maharashtra: Shiv Sena's Meenakshi Shinde becomes new mayor of Thane unopposed. pic.twitter.com/SRXuBCibRR— ANI (@ANI_news) March 6, 2017