ऑनलाइन लोकमत
पंजाबच्या गुरुदासपूरमध्ये चढ्ढा कुटुंबात जन्मलेली ही कन्या पुढे आयपीएस अधिकाऱ्याच्या भूमिकेतून महाराष्ट्राच्या मातीशी एकरूप झाली. क्रिकेटमध्ये करिअर करण्याची आलेली संधी बाजूला सारून आयएएस वा आयपीएस होण्याचा पोलीस अधिकारी असलेल्या वडिलांचा सल्ला मान्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मीरा यांचे विश्व पूर्णत: बदलले. आयपीएस चे प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर नाशिकमध्ये ते सेवेत रुजू झाल्या.
पुढे संपूर्ण कारकीर्दीतून त्यांनी पोलीस दलातील कार्यक्षम महिला अधिकारी हा लौकिक संपादन केला. मुंबईतील अतिशय संवेदनशील भागात उपायुक्त म्हणून प्रभावी काम केल्यानंतर त्यांना काहीशा संघर्षानंतर अधीक्षक म्हणून औरंगाबाद जिल्ह्याची स्वतंत्र जबाबदारी मिळाली. स्त्री-पुरुष समानतेत किंवा समान हक्कात दयाबुद्धी नव्हे, तर कर्तृत्व हाच पाया कसा असू शकतो, याचा वस्तुपाठ घालून देणारी महिला म्हणून इतिहासाला मीरा बोरवणकर यांची दखल घ्यावी लागेल.
इंग्रजी साहित्यात एम.ए. केलेल्या मीरा बोरवणकर यांनी जेथे संधी मिळाली तेथे वाचन, करिअर आणि कुटुंब व करिअर यातील समतोलाबाबत हिरीरीने सार्वजनिक प्रबोधन केले. धाडसी आणि कर्तव्यनिष्ठ ही विशेषणे त्यांच्या नावामागे कायम जोडली गेली. मुंबईतील सह-आयुक्तपद असो, की दिल्लीचा आर्थिक गुन्हे अन्वेषण विभाग असो, महत्वाच्या प्रत्येक जबाबदारीच्या पदावर त्यांनी कामाद्वारे ठसा उमटविला. त्याचवेळी त्यांनी जळगाव सेक्स रॅकेटची चौकशी करताना त्यांनी सऱ्हदयतेचा परिचयही दिला. राष्ट्रपतींच्या पोलीस पदकासह अनेक सन्मानांच्या त्या मानकरी ठरल्या आहेत.