अलिबाग : श्रीवर्धन तालुक्यातील सतीचीवाडी येथील रसिका मांडवकर या निराधार महिलेला गावपंचांनी गेल्या आठ वर्षांपासून वाळीत टाकले आहे. याबाबतची तक्रार तिने काही दिवसांपूर्वी प्रशासनाकडे केली होती. मात्र प्रशासनाच्या मध्यस्थीनंतरही तिच्यावरील सामाजिक बहिष्काराची तलवार अद्यापही टांगती आहे. तिने प्रशासनासह मुख्यमंत्र्यांचे दरवाजे ठोठावत अर्ज केला आहे.गावातील महादेव भोंबरे यांच्या आईबरोबर रसिकाचे पती रमेश यांचे क्षुल्लक कारणावरून भांडण झाले होते. त्यावरून मुंबईच्या कार्यकारिणीने गावातील स्थानिक कार्यकारिणीच्या वतीने बैठक बोलावून रमेशला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. तो अमान्य केल्याने मांडवकर कुटुंबाला गावबंदी केली. सततच्या जाचामुळे रमेश गावातून बेपत्ता झाले. त्यानंतर गावकीने तिच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मारहाण करून अन्न पाण्यावाचून दोन दिवस डांबून ठेवले.तसेच कष्टाच्या कमाईतून घर बांधण्यास २६ जानेवारीच्या ग्रामसभेत गावपंचांनी विरोध केला आणि परवानगी पाहिजे असेल, तर ते घर गावकीच्या नावावर करण्याची मागणी केली. हे अमान्य केल्याने तिला गावाबाहेर काढल्याचे रसिकाने अर्जात म्हटले आहे. तिच्या दिरानेही आश्रय देऊ नये म्हणून दबाव टाकला. मुंबई येथे झालेल्या गावकीच्या बैठकीसाठी रात्री उशीरापर्यंत थांबवून ठेवण्यात आले होते. अन्यायाबाबत पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर गावपंचांना ठाण्यात बोलावण्यात आले. वाळीतची बंदी उठवून त्रास देणार नाही असे लेखी देण्याचे गावपंचांनी मान्य केले तरी त्यांनी आपला शब्दही फिरवला. त्यामुळे सघ्या ती तणावात आहे. (प्रतिनिधी)
न्यायासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार
By admin | Published: May 05, 2015 1:31 AM