प्रा. डॉ. द. ता. भोसलेमराठी भाषेवर ज्याचं प्रेम आहे, असा कोणी साहित्य संमेलनांना; मग ते अखिल भारतीय असो किंवा अगदी तालुका किंवा गावस्तरावरचं, विरोध करेल असं मला वाटत नाही. एकच भाषा बोलणारी लाखभर माणसं एकाच वेळी एकाच ठिकाणी दोन-तीन दिवस जमतात, बोलतात, चर्चा करतात याला काहीच अर्थ नाही, असं कसं म्हणता येईल? आजच्या धकाधकीच्या काळात लेखकांना परस्परांना भेटता येतं का? या प्रश्नाचं सरळ उत्तर नाही असंच आहे. संमेलनाच्या निमित्तानं ते तसे एकत्र येतात. विचारांचं आदानप्रदान होतं, नवे विषय, नवे विचार यांची सहजपणे देवाणघेवाण होते. लेखकांनाही आपल्या वाचकांना असे समोर थेट आपल्याशी बोलताना पाहून आनंद होत असणारच की! वाचक-लेखक हा साहित्यदुवा जपायचे काम संमेलने नक्कीच करतात. या निमित्तानं नामवंत वक्त्यांची भाषणं ऐकायला मिळणं, हीही एक फायद्याचीच गोष्ट आहे. मी स्वत: तब्बल २७ पेक्षा अधिक संमेलनांना उपस्थित राहिलेला साहित्यप्रेमी आहे. अगदी अशा मोठ्या संमेलनातील नसला तरी माझा स्वत:चा विद्यार्थिदशेतील एक अनुभव सांगतो. ६० किंवा ६१ साल असेल. पुण्यातील स. प. महाविद्यालयात असंच कसलं तरी संमेलन होतं. स्वातंत्र्यवीर सावरकर बोलणार होते. ‘पाकिस्तानचं भारतावरील आक्रमण’ असा विषय होता. मैदानात प्रचंड गर्दी होती. आम्ही बरेच विद्यार्थी वसतिगृहातून खास भाषण ऐकण्यासाठी गेलो होतो. सावरकर बोलले. फारच चांगलं भाषण झालं त्यांचं. मी आता थकलो आहे, असे ते म्हणाले व खाली बसले. त्यानंतर काय झालं समजलं नाही; पण उठून त्यांनी उत्तरार्ध सुरू केला. आजही आठवण झाली तरी अंगावर काटा उभा राहतो. ओजस्वी वक्तृत्व म्हणजे काय याचाच तो अनुभव होता. संमेलन नसते तर तो मिळाला असता का, याचा मी आजही विचार करतो. आज कुठे आहेत असे वक्ते? असे म्हणण्यापूर्वी श्रोते असले तरच वक्ते तयार होतात हे लक्षात घ्यायला हवं. कोणत्याही गोष्टीत आर्थिक फायदा पाहायचा ही आजची रीतच आहे. तसा विचार केला तरी संमेलने फायद्याचीच आहेत. एरवीची ग्रंथविक्री व संमेलनातून होणारी २ ते ३ कोटी रुपयांची ग्रंथविक्री पाहा. त्यामुळे ग्रंथप्रसार आणि वाचनसंस्कृती रुजायला संमेलने हातभार लावतातच. अर्थात संमेलनात काही गोष्टी आवर्जून करायला हव्यात. नाट्यलेखनाची कार्यशाळा, अभिनयाची कार्यशाळा असं होऊ शकतं तर मग नवोदित लेखकांसाठी अशी कार्यशाळा का आयोजित केली जाऊ नये? गावांमध्ये अशा कार्यशाळांची नितांत गरज आहे, कथा कशी लिहावी, प्रसंग कसे फुलवावेत, वाचन कसं वाढवावं हे या कार्यशाळांमधून सांगता येईल. साहित्याची आवड आता फक्त शहरांपुरती मर्यादित राहिलेली नाही. अगदी खेड्यांमध्येही चांगली संमेलने होतात. महामंडळ त्यांना थोडीफार आर्थिक मदत करून ही अडचण दूर करू शकतं. त्यातून त्या मंडळींना उत्साह मिळेल. परप्रांतातही हवीत संमेलने. मराठी माणसे घर न सोडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. यानिमित्तानं एखाद्या प्रांताची ओळख होत असेल तर त्यात काही गैर नाही. नेहमीच नाही; पण अधूनमधून परप्रांतातही संमेलनं घ्यायलात हवीत, असं माझं मत आहे. एखादी सहल काढली तर मराठी माणसे आता १०-१५ हजार रुपये अगदी सहज खर्च करतात. पंजाबला जाण्यासाठी मला वाटत नाही इतका खर्च येईल. आपल्या भाषेसाठी आपण एवढंही करणार नसू तर काय बोलायचं? आणि कशाला बोलायचं?(लेखक ज्येष्ठ साहित्यिक आहेत.)
संमेलन हवेच!
By admin | Published: April 02, 2015 3:11 AM