मुंबई : गेल्या दोन वर्षांत राज्य सरकारने केलेल्या कामगिरीचा मतदारांनी केलेला लेखाजोखा नगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने समोर येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागेल. सध्या या नगरपालिकांमधील संख्याबळाचा विचार करता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे. मात्र गेल्या पाच वर्षांत राजकीयदृष्ट्या बरेच पाणी वाहून गेले आहे. पाच वर्षांपूर्वी निवडणूक झाली तेव्हा आघाडी सरकार होते. त्यानंतरच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेनेने प्रचंड यश मिळविले. विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेनेने निर्विवाद यश संपादन केले. गेल्या दोन वर्षांत फडणवीस सरकारने केलेली विकासाची कामे लोकांच्या पसंतीला उतरली का याची ही निवडणूक म्हणजे एक चाचणी असेल. तसेच, या स्थानिक स्वराज्य संस्थांवरील आपले वर्चस्व कायम ठेवण्याचे आव्हान काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर असेल. आघाडी वा युतीतील कोणत्याही पक्षाने ही निवडणूक स्वबळावर लढायची की आघाडी/युतीमध्ये या बाबतचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, शिवसनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही कसोटी लागणार आहे. मराठा मोर्चांचा काही राजकीय परिणाम होतो काय याची चाचणीदेखील या निवडणुकीच्या निमित्ताने होणार आहे. पुढील वर्षीच्या सुरुवातील होणाऱ्या महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांची ही रंगीत तालिम असेल. आघाडी वा युती करण्यासाठी सर्वच पक्षांकडे कमी दिवस आहेत. पहिल्या टप्प्यात २७ नोव्हेंबरला १४७ नगरपालिकांच्या नगराध्यक्षांची थेट निवडणूकीस उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २९ आॅक्टोबर आहे. (विशेष प्रतिनिधी)
मुख्यमंत्र्यांसह प्रमुख नेत्यांची प्रतिष्ठा पणाला
By admin | Published: October 18, 2016 5:25 AM