मुंबई : धनगर समजाला आरक्षण मिळावे, म्हणून यापुढे सरकारला निवेदन देणार नसून, आता रस्त्यावरच भेटणार असल्याचा इशारा धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला आहे. आरक्षणासाठी धनगर समजाने जेजुरीहून काढलेली बाइक रॅली गुरुवारी मुंबईत येऊन धडकली.‘येळकोट’चा गजर करीत आलेल्या बाइक रॅलीचे आझाद मैदानात जाहीर सभेत रूपांतर झाले. या वेळेस शेंडगे म्हणाले की, ‘धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याच्या नावाखाली गेली दोन वर्षे सरकार वेळकाढूपणा करत आहे. त्यामुळे यापुढे आरक्षण मिळावे, म्हणून सरकारला निवेदन देणार नसून, रस्त्यावर भेटणार आहे,’ असे त्यांनी सांगितले.या वेळी आमदार रामराव वडकुतेही आझाद मैदानावर उपस्थित होते. जेजुरीहून आणलेला भंडारा मैदानात उधळत, त्यांनी आरक्षणाची मागणी पूर्ण होत नाही, तोपर्यंत सरकारला सळो की पळो करून सोडण्याचा इशारा दिला. आरक्षणासाठी काढलेल्या या बाइक रॅलीत महिला कार्यकर्त्यांनीही सहभाग घेतला होता. (प्रतिनिधी)
‘धनगर आरक्षणासाठी रस्त्यावर भेटू!’
By admin | Published: March 11, 2016 4:13 AM