यदु जोशी, ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - केंद्रीय भृपृष्ठ वाहतूक आणि जहाज बांधणी मंत्री नितीन गडकरी आणि दक्षिणेतील सुपरस्टार रजनीकांत यांची गुरुवारी चेन्नईत रजनीकांत यांच्या बंगल्यावर गळाभेट झाली. दोघांची जुनी मैत्री. क्रिकेट वर्ल्ड कपची फायनल मॅच मुंबईत झाली तेव्हा रजनीकांत आले होते. तेव्हा त्यांनी वरळीतील गडकरींच्या घरी आवर्जून भेटही दिली आणि त्यांना चेन्नईला येण्याचे आमंत्रण दिले होते.गडकरींची कन्या केतकी हिच्या लग्नाचे रिसेप्शन डिसेंबरमध्ये नवी दिल्लीत होते तेव्हा रजनीकांत हे तब्येत चांगली नसल्याने येऊ शकले नव्हते पण त्यांची पत्नी या रिसेप्शनला आली होती. काल गडकरींच्या खात्याचे दोन कार्यक्रम चेन्नईत होते. का कोण जाणे गेला आठवडाभर म्हणे रजनीकांत यांना स्वप्नात खाण्याचे अनेकानेक चविष्ट पदार्थ आणि हजारो कोटींच्या घोषणाच दिसत होत्या. त्याला कळेना. तेवढ्यात गडकरींचा फोन आला, ‘ मी चेन्नईला येतोय, आपल्याला भेटीन म्हणतो ..., अन् मग त्या स्वप्नाचा खुलासा झाला. गडकरी चेन्नईत येणार असल्याची ती शुभ चाहूल होती तर...
चेन्नईमध्ये शुक्रवारी एक चमत्कार झाला. दोन रजनीकांत एकमेकांना भेटले. खोटं वाटलं नं पण हे अगदी म्हणजे अगदी खरं आहे.सिनेमावाला रजनीकांत सगळ्यांनाच माहिती आहे. दक्षिणेतील भन्नाट लोकप्रिय अभिनेता. लोकांनी त्याची मंदिरं बांधली, त्याचा सिनेमा बघायला लोक मिरवणुकीनं जातात. रजनीबद्दलचे किस्सेही तसेच अफलातून. एकदा म्हणे त्यानं असा काही चेक लिहिला की बँकच बाऊन्स झाली.पावसामुळे क्रिकेटची मॅच बरेचदा रद्द होते पण रजनीकांत खेळत असेल तर मॅचमुळे पाऊस रद्द होतो म्हणे! असंही म्हणतात की रजनीकांत एका पक्ष्यात दोन दगड मारतो. तो पियानोने व्हायोलिन वाजवू शकतो. एकदा म्हणे रजनीकांतला अतिविषारी कोब्रा चावला आणि चार दिवसांनी तो कोब्रा मेला. अशा एक ना अनेक साहसी आणि सुरस गोष्टी रजनीच्या नावावर खपविल्या जातात. तुम्ही विचाराल, अरे! भाऊ हा रजनी तर सगळ्यांनाच माहिती आहे पण तो दुसरा रजनीकांत कोणता ते तर सांगा?हा दुसरा रजनीकांत राजकारणी आहे. राजकारणात असूनही ‘टेक तं टेक नाहीतर रामटेक’ अशा पद्धतीनं बिनधास्त वावरणारा.‘मी जिंदगीत कोणाची बॅग उचलली नाही, कोणासाठी बुके घेऊन विमानतळावर गेलो नाही, आपल्या टर्म्सवर राजकारण केलं’ असं बिनदिक्कत सांगणारा. इतरांची रेषा लहान करण्यापेक्षा स्वत:ची वाढविण्यावर आपला विश्वास आहे, असे सांगत आपल्याशीच स्पर्धा करणारा.त्याची स्पर्धा इतर कोणाशी नाही तर स्वत:शीच असते.तो रजनीकांत जसा निश्चिंत अन् बेडर तसाच हा नेतादेखील. बोलण्यात अस्सल नागपुरी बाज असलेले हे नेते म्हणजे आमचे नितीनभाऊ! मंत्री म्हणून काम करताना ते किमान पाचदहा हजार कोटींपेक्षा जास्तीच्या विकास कामांबद्दलच बोलतात. छोट्या रकमांची आकडेमोड त्यांना येतच नाही. अख्ख्या देशात लाखो कोटी रुपये खर्चून रस्त्यांचं प्रचंड जाळं त्यांनी विणायला घेतलंय. रोज घोषणांचा पाऊस पाडताहेत. कालच्या भेटीत रजनीकांतला म्हणे त्यांनी विकासकामांवरील खर्चाची आकडेवारी फाडफाड सांगितली तर रजनीकांत चकितच झाले....रजनीकांत मी का गडकरी असा प्रश्नही त्यांना पडला म्हणे! दोघांची तासभर भेट झाली. विस्मयचकित करणाऱ्या आकडेवारीच्या प्रभावातून रजनीकांत बाहेर येत नाहीत तोवर गडकरी निघूनही गेले होते. भेटीला राजकीय रंगहीतमिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या निधनानंतर रजनीकात यांना पक्षात आणण्याच्या हालचाली भाजपा करणार असल्याचे म्हटले जात होते. गडकरी-रजनीकांत भेटीकडे त्या दृष्टीनेदेखील बघितले जाते. तथापि, ही भेट राजकीय नाही तर अगदीच व्यक्तिगत स्वरुपाची होती, असे गडकरी यांच्या कार्यालयाने स्पष्ट केले.