मुंबई, दि. 16- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मुंबईत भाजपा प्रदेश कार्यकारणीची बैठक होणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मंत्रिमंडळातील खांदेपालटावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.
घोटाळ्याचे आरोप झालेले गृहनिर्माण राज्यमंत्री प्रकाश मेहता आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी मुख्यमंत्र्यांकडे राजीनामा देण्याची तयारी दाखवली होती पण मुख्यमंत्र्यांनी दोन्ही मंत्र्यांची पाठराखण केली. सध्या राजीनामा देण्याची गरज नाही, चौकशी पूर्ण होऊ द्या, त्यानंतर बघू, असं उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. लोकायुक्तांमार्फत मेहतांची चौकशी होणार आहे. मात्र विरोधकांनी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तर दुसरीकडे रावसाहेब दानवे आणि आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांचीही मंत्रिमंडळातून गच्छंती होण्याची शक्यता आहे.
आणखी बातम्या वाचा
तामिळनाडूप्रमाणे आता कर्नाटकात 10 रुपयात मिळणार जेवणाची थाळी
26/11 सारखा हल्ला रोखण्यासाठी कोस्ट गार्डसाठी 32 हजार कोटींचा प्लान मंजूर
रावसाहेब दानवे यांच्या सततच्या वादग्रस्त विधानामुळे त्यांना मंत्रिमंडळातून नारळ देण्यात येईल, अशी शक्यता वर्तविली जाते आहे. दानवेंनी शेतकऱ्यांबद्दल केलेलं आक्षेपार्ह वक्तव्य, त्यानंतर लक्ष्मीदर्शन घेण्याचा सल्ला आणि आता थकवलेलं वीज बिल. त्यामुळे दानवेंबद्दल चर्चांना उधाण आलं आहे. तर याशिवाय गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांचं नावही रडारवर आहे. एमपी मिल कंपाऊंडचा एफएसआय खासगी बिल्डरच्या घशात घालण्यासाठी यांनी फाईलवर थेट मुख्यमंत्र्यांचं नाव वापरण्याची कमाल केली. एसआरए घोटाळ्याची ही मालिका मुख्यमंत्र्यांसाठी अडचणीची ठरु लागली आहे. शिवाय मेहतांना हटवलं नाही, तर खडसेंवर अन्याय झाल्याची भावना एका समाजात बळावू शकते आणि सरकार बिल्डरधार्जिणं असल्याचा प्रचारही वाढू शकतो. त्यामुळे मेहतांना विश्रांती देण्याची सक्ती होणार आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. मंत्रिमंडळात खांदेपालट होण्याच्या यादीत आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांचंही नाव चर्चेत आहे. पालघर जिल्ह्यात कुपोषणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. एप्रिल 2016 पासून तब्बल 600 आदिवासी मुलं कुपोषणाने दगावली. त्यामुळे सावरांच्या कारभारावर मुख्यमंत्री नाखुश असल्याचं बोललं जातं आहे.
दरम्यान, आज होणाऱ्या भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत नेमकं काय होणार ? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.