एकेकाळी भाजपामधील बडे नेते असलेले आणि सध्या शरद पवार गटाकडून विधान परिषदेचे आमदार असलेले एकनाथ खडसे हे मागच्या काही काळात बदललेल्या राजकीय परिस्थितीमुळे भाजपात घरवापसी करण्यासाठी प्रयत्नशील असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काल रात्री एकनाथ खडसे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अचानक भेट घेतल्याने आता एकनाथ खडसे यांचा भाजपात प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशा चर्चांना उधाण आलं आहे. त्या पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे.
एकनाथ खडसे देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट आणि भाजपामधीस घरवापसीच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना म्हणाले की, मी माझ्या मतदारसंघातील विकासकामांसंदर्भात मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये भाजपामध्ये जाणं किंवा प्रवेश करणं याबाबतची कोणतीही चर्चा किंवा राजकीय चर्चा या बैठकीमध्ये झालेली नाही., असे एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्याशी ही भेट झाली तेव्हा आपल्यासोबत तिथे कुणीही उपस्थित नव्हतं, मी एकटाच भेटायला गेलो होतो, असंही एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केलं आहे.
दरम्यान, एकनाथ खडसे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काल रात्री अचानक भेट झाल्याने चर्चांना उधाण आलं होतं. २०१४ साली भाजपा राज्यात सत्तेवर आला तेव्हा देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्यात आलं होतं. त्यावेळी ज्येष्ठ नेते असलेले एकनाथ खडसे नाराज झाले होते. तसेच त्यांच्यात आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये संघर्षाला तोंड फुटले होते. त्यानंतर काही वर्षांनी एकनाथ खडसे यांनी भाजपाला राम राम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र पक्षात पडलेली फूट आणि विधानसभा निवडणुकीनंतर राज्यातील बदललेली समीकरणं विचारात घेऊन एकनाथ खडसे हे घरवापसी करतील असे दावे केले जात होते. मात्र आता खडसे यांनी स्पष्टीकरण देत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे.