ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20- केंद्र सरकार पुरस्कृत अपंग समावेशित शिक्षण योजनेतील विशेष शिक्षकांचे सरकारविरोधातील आंदोलन मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही सुरूच राहणार आहे. सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेली बैठक फिस्कटल्याने आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय अपंग समावेशित शिक्षण योजना विशेष शिक्षक कृति समितीने घेतला आहे. समितीचे कार्यकारिणी सदस्य विजय कदम यांनी सांगितले की, मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी कृति समितीच्या आंदोलनाला सोमवारी पाठिंबा दिला. शिवाय निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांची भेटही घडवून दिली. मात्र विशेष शिक्षकांच्या मागण्यांवर कार्यवाही सुरू असल्याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिली. त्यामुळे असमाधानी असलेल्या शिक्षकांनी मंगळवारीही आंदोलन कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. नागपूरमध्ये कृति समितीच्या शिक्षकांनी मुंडन केल्याचे कदम यांनी सांगितले. ते म्हणाले की, शिक्षक आमदार नागो गाणार यांच्या नेतृत्त्वाखाली मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यानंतरही तोडगा निघाला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.का सुरू आहे आंदोलन?
राज्यातील माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या सामान्य शाळेतील अपंग विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्यासाठी केंद्र सरकारने या योजनेची सुरूवात केली. २०१५-१६ या शैक्षणिक वर्षात १ हजार १८५ शिक्षकांवर ४३ हजार ५६९ विशेष गरजा असणाऱ्या विद्यार्थ्यांना स्वावलंबी करण्याची जबाबदारी होती. मात्र एकात्मिक शिक्षण पद्धतीनुसार राज्यातील केवळ ९ हजार ०६९ विद्यार्थ्यांनाचया योजनेचा लाभ मिळालेला आहे. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांना लाभ देण्यासाठी कामावरून कमी केलेल्या १ हजार १८५ शिक्षकांना पुन्हा सेवेत घेण्याची मागणी कृती समितीने केली आहे.