ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी 17 पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. संसदेमध्ये 17 पक्षातील नेत्यांच्या बैठकीला सुरूवात झाली आहे. या बैठकीमध्ये राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराच्या नावावर चर्चा होणार असल्याची माहिती मिळते आहे. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, बसपाच्या अध्यक्ष मायावती, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव, सीताराम येचुरी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, जेडीयूचे नेते शरद यादव, ओमार अब्दुल्ला, के.सी त्यागी तसंच समाजवादीचे नेते रामगोपाल यादव हजर आहेत.
बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचा पूर्वनियोजीत कार्यक्रम असल्यामुळे ते या बैठकीला गैरहजर असल्याची माहिती मिळते आहे. त्यांच्याऐवजी शरद यादव पक्षाचं या बैठकीत प्रतिनिधित्व करत आहेत. विरोधीपक्षांच्या बैठकीत राष्ट्रपती पदासाठी संयुक्त उमेदवार देण्याच्या मुद्द्यावर चर्चा होइल, अशी माहिती मिळते आहे.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या आधी काँग्रेसकडून सर्व पक्षामध्ये एकजुट निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचं बोललं जातं आहे. या एकजुटीचा फायदा काँग्रेसला गुजरात, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांच्या आगामी विधानसभा तसंच 2019 च्या लोकसभा निवडणुकीत करून घ्यायचा आहे, अशीही चर्चा सध्या सुरू झाली आहे.