लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणारा ‘बास्केट ब्रीज’ या मंजूर झालेल्या प्रकल्पाच्या कामाला पुढील महिन्यात गती मिळणार आहे. या कामाच्या निविदा आदी पाठपुराव्यांसाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात नवी दिल्ली येथे केंद्रीय भूपृष्ठ व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली आहे. खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रयत्नांतून हा सुमारे १७० कोटी रुपये खर्चाचा हा आव्हानात्मक प्रकल्प साकारत आहे.कोल्हापूर शहराचा ‘प्रवेश पॉईट’ हा चांगला व सौंदर्यात भर घालणारा असावा, पुणे-मुंबईहून कोल्हापुरात प्रवेश करताना गांधीनगर फाट्याजवळ होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पंचगंगा पुलापासूनच नवा ‘बास्केट ब्रीज’ करण्याची संकल्पना खासदार धनंजय महाडिक आखली होती. त्याचा खासगी कन्सल्टंट प्रस्ताव तयार करून तो केंद्रापुढे सादर केला. आराखडा तयार करून थेट केंद्रीय भूपृष्ठ व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर मांडून त्याला मंजुरीही घेतली आहे. त्यानंतर राज्य शासनानेही या प्रकल्पाला ग्रीन सिग्नल दिला आहे. या संपूर्ण प्रकल्पासाठी संपूर्ण निधी हा केंद्र सरकार देणार आहे. गेल्या पावसाळ्यानंतर आराखडा, निविदा, अंदाजपत्रक आदी बाबी पूर्ण करण्यात येणार होत्या; पण त्यानंतर शासनाचे दुर्लक्ष, पर्यायी शिवाजी पुलाचा प्रश्न अशा बाबींमुळे या ‘बास्केट ब्रीज’ प्रकल्पाकडे दुर्लक्ष झाले. पर्यायी शिवाजी पुलाचाही प्रश्न मार्गी लागल्याने आता लक्ष ‘बास्केट ब्रीज’वर केंद्रीत करण्यात येणार आहे. प्रकल्पाच्या पाठपुराव्यासाठी जूनच्या पहिल्या आठवड्यात नवी दिल्ली येथे मंत्री गडकरी यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली आहे. बैठकीत प्रकल्पाचा आराखडा, निविदा प्रक्रिया, अंदाजपत्रक या विषयावर चर्चा करून प्रत्यक्ष कामाची निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहे.काम सुरू होण्यापूर्वीच प्रकल्पाच्या किमतीत वाढ‘बास्केट ब्रीज’ची संकल्पना मांडताना त्याचा प्राथमिक खर्च सुमारे १२० कोटी अपेक्षित होता; पण काम वेळेवर न झाल्यामुळे काम सुरू होण्यापूर्वीच अपेक्षित खर्चात वाढ झाली असून तो सुमारे १७० कोटींवर पोहोचला आहे; पण त्या वाढीव खर्चासह केंद्राने हिरवा कंदील दाखविला आहे.पुणे ते बंगलोर या राष्ट्रीय महामार्गावर शिरोलीनजीक ‘बास्केट ब्रीज’ची उभारणी होणार आहे. तो ब्रीज थेट कोल्हापूर प्रवेशद्वाराच्या कमानीत उतरेल. या पुलासाठी पंचगंगा नदीवर कोणताही खांब असणार नाही. हा पूल पूर्ण वक्राकृती असणार आहे.अत्यंत देखण्या स्वरुपात अशी या ब्रीजची रचना असल्याने कोल्हापूरच्या सौंदर्यात भर पडणार आहे.
बास्केट ब्रीजबाबत पंधरा दिवसांत दिल्लीत बैठक
By admin | Published: May 20, 2017 1:16 AM