मुंबई : महाड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करणे आणि अन्य विकासकामांसाठी संबंधित लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विधान परिषदेत दिले. राष्ट्रवादीच्या सुनील तटकरे यांनी महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या दुरवस्थेचा मुद्दा लक्षवेधी सूचनेद्वारे मांडला. या वेळी झालेल्या चर्चेला उत्तर देताना सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले म्हणाले की, रायगड जिल्ह्यातील महाड येथील बाबासाहेबांच्या राष्ट्रीय स्मारकात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा पुरविण्यात येतील. पर्यटनस्थळ म्हणून विकसित करतानाच स्पर्धा परीक्षा केंद्र, सुसज्ज ग्रंथालय आणि अद्ययावत नाट्यगृहाच्या निर्मितीसाठी लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल.महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारकच्या व्यवस्थापन, देखभाल आणि सुरक्षेची जबाबदारी पुणे येथील बार्टी या संस्थेकडे आहे. या स्मारकाच्या देखभालीसाठी १८ कर्मचारी कार्यरत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत नाट्यगृहाची दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यासाठी ८ कोटींचा निधी खर्च करण्यात येत आहे. हे काम बार्टीमार्फत सुरू आहे. सध्या स्मारकातील ग्रंथालयात ९ हजार ६१३ इतकी ग्रंथसंपदा आहे. या ठिकाणी अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसेच येथे स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू केले जाणार आहे.(प्रतिनिधी)>बैठक घेणार : महाड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाच्या अन्य काही अडचणी दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींसोबत बैठक घेण्यात येईल, असे बडोले यांनी सांगितले.
महाडच्या विकासासाठी बैठक - बडोले
By admin | Published: August 04, 2016 4:32 AM