लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जम्मू काश्मीरच्या कुपवाडामध्ये शहीद झालेले पोगरवाडी, ता. सातारा येथील कर्नल संतोष महाडिक यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांचा शनिवार, दि. ९ रोजी लेफ्टनंट पदाचा दीक्षांत समारोह होणार आहे. या सोहळ्यासाठी महाडिक कुटुंबीयांसह स्वाती यांच्या माहेरची मंडळीही चेन्नईत दाखल झाली आहे. गेल्या अकरा महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणानंतर त्यांची पहिली पोस्टिंग पुणे येथील देहूरोड येथे होणार आहे.
नोव्हेंबर २०१५मध्ये कुपवाडा येथे ४१ राष्ट्रीय राईफल्स बटालियनचे नेतृत्व करताना दहशतवाद्यांच्या हल्ल्यात कर्नल संतोष महाडिक शहीद झाले होते. त्यांच्या या शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर ‘शौर्यचक्र’ पुरस्कारही दिला गेला. शहीद कर्नल यांच्या अंत्यसंस्कार विधीदरम्यान त्यांच्या पत्नी स्वाती महाडिक यांनी स्वत: लष्करात रुजू होण्याबरोबरच आपल्या मुलांनाही सैन्यातच भरती करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर आॅक्टोबर २०१६ मध्ये स्वाती या आॅफिसर्स ट्रेनिंग अकादमीत प्रशिक्षणासाठी दाखल झाल्या होत्या. स्वाती महाडिक यांनी गेल्या ११ महिन्यांत स्वत:ला सैन्याच्या शिस्तीत बांधून घेतले आहे.प्रशिक्षणातही अव्वल‘सैन्यात भरती होणं,’ या एकाच उद्देशाने झपाटून जाऊन त्यांनी प्रशिक्षणार्थींमध्ये अव्वल राहून त्यांनी आपल्यातील जिद्दीचे दर्शन घडविले आहे. चेन्नई येथे शुक्रवारी प्रशिक्षण तळावर झालेल्या कौतुक सोहळ्यात त्यांना ‘बेस्ट कॅडेट’ म्हणून मिळालेलं पदक स्वाती यांनी आपल्या कुटुंबीयांना दाखविले. सासू कालिंदा घोरपडे, वडील बबन शेडगे, आई तसेच मुलं स्वराज अन् कार्तिकी यांच्या साक्षीने मराठी महिलेच्या जिद्दीचे त्यांनी पुन्हा एकदा देशाला दर्शन घडविले.