नांदेड: एमआयएमच्या १० नगरसेवकांनी माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांची शुक्रवारी भेट घेतली. चव्हाण यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतली असल्याचे सांगण्यात येत असले तरी, आगामी काळातील बदलत्या राजकारणाचे संकेतच यातून मिळाले. याशिवाय राज्यभरातील माजी मंत्री, खासदार, आमदारांसह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनीही नांदेडमध्ये येऊन चव्हाणांना सदिच्छा दिल्या.विधान परिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर राज्यातील असंख्य पदाधिकारी नांदेडमध्ये आले होते. विशेषत: नांदेडमधील काँग्रेससह अन्य पक्ष व आघाड्यांतील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीतील सदस्य मतदारांनी भेट घेतली. मुख्यमंत्रीपदाच्या कालखंडात झालेल्या भव्य वाढदिवस आयोजनाची प्रचिती प्रदेशाध्यक्ष म्हणून यंदा पुन्हा आली. मनसेतून काँग्रेसमध्ये आलेले, बिलोली विकास आघाडी यासह एमआयएमची स्वतंत्र भेट राजकारणाच्या बदलत्या समीकरणाची नांदी दिसून आली. विधान परिषद तसेच स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांची जय्यत तयारी आजच्या वाढदिवस सोहळ्याच्या निमित्ताने प्रकर्षाने दिसून आली. खा. चव्हाण यांनी सकाळी गुरुद्वारा येथे दर्शन घेतले. त्यानंतर वडील दिवंगत शंकरराव चव्हाण व आई कुसुमताई यांच्या समाधीस्थळी आशीर्वाद घेऊन ते कार्यकर्त्यांच्या भेटीसाठी उपस्थित राहिले. यावेळी माजी पालकमंत्री आ. डी. पी. सावंत, आ. अमरनाथ राजूरकर, आ. अमित झनक, आ. वसंतराव चव्हाण यांच्यासह माजीमंत्री रमेश बागवे, नागपूरचे माजी महापौर रवींद्र सपकाळ, प्रदेश चिटणीस सुनील ओझा, प्रदेश उपाध्यक्ष अनंत घारट, माजीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील आणि राज्यभरातून आलेल्या विविध पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)विधान परिषदेचे आश्वासक पाऊलनांदेडमध्ये होत असलेल्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकुण ४७४ पैकी काँग्रेससह तब्बल २७५ मतदार सदस्यांनी खा़ चव्हाण यांची शुक्रवारी भेट घेऊन आश्वासक पाऊल टाकले़ परिणामी या निवडणुकीसाठी काँग्रसने मोठी ताकद उभी करत आपली बाजू अधिक भक्कम केली आहे़
एमआयएम नगरसेवक अशोक चव्हाणांच्या भेटीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2016 1:59 AM