ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २२ - देवनार डम्पिंग ग्राउंडमध्ये वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर व्यथित झाला असून याप्रकरणी तोडगा काढण्यासाठी तो आज महापालिका आयुक्त अजय मेहता यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे. दरम्यान याचप्रकरणी सचिनने मेहता यांना काही दिवसांपूर्वी पत्रही पाठवले होते, देवनार डंपिंग ग्राऊंडबाबत कायमस्वरुपी तोडगा काढण्याची विनंती त्याने केली होती.
या पत्रात सचिनने देवनार डंपिंग ग्राऊंडजवळ राहणा-या लोकांना होणा-या समस्या मांडल्या होत्या. तसेच महापालिकेने याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचेही त्याने नमूद केले होते.
‘डम्पिंग ग्राउंड परिसरात शिवाजीनगर येथील तीन वसाहतींमध्ये स्वत: पाहणी करून स्थानिकांशी चर्चा केल्यानंतर येथील भयाण परिस्थिती सुन्न करणारी होती़ येथील रहिवाशी मूलभूत सुविधांपासूनही वंचित असून, कचऱ्याला लागणाऱ्या आगीमुळे त्यांचे आरोग्य बिघडत आहे,' असे सचिनने पत्रात म्हटले होते. स्वच्छता, पिण्यायोग्य पाणी, मलनि:स्सारण वाहिनी, प्राथमिक शिक्षण या मूलभूत सुविधा या परिसरात नाही़ अशा वेळी पालिकेने येथील आरोग्यासाठी राखीव निधीमध्ये केलेल्या कपातीबाबत सचिनने आश्चर्य व्यक्त केले. कचऱ्याचा भार या डम्पिंग ग्राउंडवरून कमी करण्यासाठी हाती घेतलेल्या छोट्या-छोट्या प्रकल्पांना गती देण्याची सूचनाही त्याने केली होती.
आता याचप्रकरणी सचिन आज मेहता यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे.