मुंबई - पुढील काही दिवसांत राज्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणूक होईल असं मुख्यमंत्र्यांनी संकेत दिले होते. त्यात महायुती आणि महाविकास आघाडीत जागावाटपावर सातत्याने बैठका सुरू आहेत. यातच आज सकाळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी जात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. मुख्यमंत्री आणि राज यांच्या अचानक झालेल्या भेटीने अनेकांच्या भूवया उंचावल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी राज ठाकरे पोहचले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा ते पाऊण तास चर्चा झाल्याची माहिती आहे. या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चाही झाली, सकाळी ९ वाजता राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मनसे नेत्यांची शिवतीर्थ निवासस्थानी बैठक होती. मात्र बैठकीपूर्वीच राज आणि एकनाथ शिंदे यांच्यात चर्चा झाली. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीवर हे दोन्ही नेते एकमेकांशी संवाद साधून असल्याचं दिसून येते.
मनसेनं दिला स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा
लोकसभा निवडणुकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना-भाजपा महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. राज ठाकरे यांनी महायुतीच्या काही उमेदवारांसाठी प्रचारसभाही घेतल्या. मात्र त्यानंतर विधानसभा निवडणुकीत मनसेनं स्वबळाचा नारा दिला आहे. मनसे राज्यात २२०-२२५ जागा लढवेल असं राज ठाकरेंनी म्हटलं. त्याशिवाय राज ठाकरेंनी महाराष्ट्र दौऱ्यात जात काही ठिकाणाचे उमेदवारही जाहीर केलेत. त्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.
अमित ठाकरे निवडणुकीच्या रिंगणात?
मागील मनसे नेत्यांच्या बैठकीत अमित ठाकरे यांनी स्वत:सह पक्षातील इतर नेत्यांना निवडणुकीत उतरण्याचं मत मांडले होते, त्यामुळे अमित ठाकरे विधानसभा निवडणूक लढवणार हे समोर आले. त्यानंतर अमित ठाकरेंसाठी सुरक्षित मतदारसंघ कोणता यावर माध्यमांमध्ये चर्चा झाली. अमित ठाकरे वरळीतून लढणार का असा प्रश्न पत्रकारांनी त्यांना विचारला, तेव्हा राजसाहेबांनी आदेश दिले तर कुठूनही निवडणूक लढवण्यास मी तयार आहे असं अमित ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यामुळे ठाकरे कुटुंबातील आणखी एक सदस्य थेट निवडणुकीच्या मैदानात उतरणार असल्याने राज ठाकरे आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीकडे त्यादृष्टीनेही पाहिले जात आहे.