मुंबई - राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होत असून, या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेत्यांची बैठक विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी पार पडत आहे. अधिवेशनात सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याची रणनीती आखली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
उद्या ( सोमवार ) पासून सुरू होत असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेससह सर्व विरोधी पक्षनेत्यांच्या गटनेत्यांची बैठक सुरु झाली आहे. धनंजय मुंडे यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक सुरु आहे. अधिवेशनच्या पार्श्वभूमीवर सरकारच्यावतीने सायंकाळी चाहपानीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या चहापानाला उपस्थित राहायचे की नाही, यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच बरोबर, राज्यातील दुष्काळ, मंत्र्यांचे भ्रष्टाचार,ढासळतलेली कायदा व सुव्यवस्था, आरक्षणाचे रखडलेले प्रश्न यासह अनेक प्रश्नावरून सरकारला कसे कोंडीत पकडण्यात येईल,यावर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे.
या बैठकीला, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार , आमदार छगन भुजबळ, काँग्रेसचे विधीमंडळ नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चौहान, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभा गटनेता आमदार विजय वडेट्टीवार,माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, शेकाप नेते आमदार गणपतराव देशमुख, विधानसभा उपनेता आमदार नसीम खान, शेकापचे नेते आमदार जयंत पाटील, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे नेते आमदार जोगेंद्र कवाडे आदींची उपस्थित आहे.