होळीनिमित्त म्हणून असली तरी या पार्टीमागे फार मोठे कारण होते. कारण होळी हे केवळ निमित्तच होते. पुढल्या महिन्यात अ. भा. साहित्य महामंडळाचे कार्यालय नागपुरात येत आहे आणि अ. भा. साहित्य संमेलनाच्या आयोजनाचे निर्णय आता विदर्भ साहित्य संघाच्या अखत्यारित बऱ्यापैकी येणार आहेत. या संमेलनात अध्यक्ष म्हणून वर्णी लागावी आणि हवा निर्माण व्हावी म्हणून डॉ. अक्षयकुमार काळे यांनी होळीनिमित्त पार्टी ठेवली. स्थळ त्यांचेच घर नरकेसरी सोसायटी होते. अर्थातच त्यात विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर यांना खास ‘विशेष’ आमंत्रण होते. डॉ. काळे यांना संमेलनाध्यक्षपदी अविरोध निवडून येण्याची इच्छा आहे. हे ‘अविरोध’ निवडून येणे म्हणजे काय असते? त्यासाठी कुठली आश्वासने द्यावी लागतात आणि असंतुष्टांना कसे शांत करायचे, याचा अनुभवसमृद्ध अभ्यास आणि प्रात्यक्षिक म्हैसाळकरांनी तीन वेळा दिले आहे. त्यामुळे म्हैसाळकरांसाठी विशेष व्यवस्था होती. मुळात डॉ. अक्षयकुमार काळे यांना संमेलनाध्यक्षपदाचे फार आकर्षण वाटत नव्हते पण प्रमोद मुनघाटे यांनी त्यांना संमेलनाध्यक्षपदाचे महत्त्व पटवून दिले तेव्हापासूनच ते पेटले आहे. पण त्यांनी कधीही त्यांच्या निर्विकार चेहऱ्यावर याचा मागमूसही कुणाला लागू दिला नाही. महामंडळ नागपुरात आल्यावरच प्रयत्न करायचा, हे त्यांनी तीन वर्षापासून ठरवून टाकले होते. (इतका मुत्सद्दीपणा काळे दाखवू शकतात, यावर विश्वास ठेवता येत नाही) पण यामागेही मुनघाटेंची काही महत्त्वाकांक्षा असली पाहिजे. सायंकाळी होलिकादहनाच्यावेळी हळुहळु निमंत्रित पाहुण्यांची वर्दळ वाढली. म्हैसाळकर वेळेच्या बाबतीत तसे ‘प्रॉम्ट’ आहेत. (त्यांचे ‘परफेक्ट टायमिंग’ साहित्य संघाच्या निवडणुकीत ‘बिनविरोध’ दिसले आहे.) म्हैसाळकर आणि त्यांच्यासोबतच विलास चिंतामण देशपांडे, प्रदीप मोहिते, प्रकाश एदलाबादकर आले. त्यावेळी तीर्थराज कापगते आणि श्याम धोंड अस्सल दुधाची भांग घोटत होते. भांग घोटतानाही या दोघांच्या चर्चा कवितेवरच चालल्या होत्या. भांगाच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल श्याम धोंड यांचे विवेचन ऐकून तीर्थराज स्तिमित होते. त्यांना पाहिल्यावर म्हैसाळकर जरा दचकले. त्यांनी आपल्या दाढीवर हळुवार हात फिरवित किंचित हास्य चेहऱ्यावर आणले. थोड्या वेळाने एदलाबादकर दिसेना म्हणून म्हैसाळकरांनी मोहिते यांना पाठविल्यावर ते लपून-लपून भांग घेऊन पाहात होते. अजून मनासारखी जमली नाही, घोटा-घोटा म्हणून तीर्थराज कापगते यांना सांगतांना मोहिते यांनी पाहिले आणि सवयीप्रमाणे म्हैसाळकरांना सांगितले. म्हैसाळकर संतापले पण ते चेहऱ्यावर न येऊ देता त्यांनी एदलाबादकरांना हाक मारली. तोपर्यंत मास्तर महामंडळाचे पदाधिकारी झाले होते. थोड्या वेळाने सांस्कृतिक नेते गिरीश गांधी आले. आपण केवळ अक्षयच्या प्रेमापोटी आलो आहोत. बाकी बाबींशी आपला काही संबंध नाही, असे ते सांगत असतानाच त्यांच्यासह महेश एलकुंचवारही आले. पण गिरीशभाऊंनी म्हैसाळकरांच्या शेजारी असलेली त्यांची खुर्ची ओढून ती त्यांच्या विरुद्ध दिशेला ठेवली. (याचा नेमका अर्थ एलकुंचवारांना कळला नाही). ते दोघांच्याही मधल्या खुर्चीवर बसले. एव्हाना भांग शिजली असल्याचे मास्तरांनी खुणाविले. अक्षयकुमारांनी सर्वांचेच स्वागत केले. साऱ्यांनीच राज्य साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले. पण गालिबच्या ग्रंथावरचा पुरस्कारही अक्षयकुमारांना होळीच्याच दिवशी मिळावा, हा योग जोरदार असल्याचे म्हैसाळकरांनी म्हटल्यावर हंशा पिकला. गालिबच्या मयखान्याचा आनंद समजून घ्यायला अनुभवच लागतो. अनुभवांचे संचित घेऊन न आलेले साहित्य रसिकांच्या मनाला भिडत नाही, असे विधान एलकुंचवारांनी केल्यावर गांधी यांनी कुतूहलाने त्यांच्याकडे पाहिले. गिरीशभाऊंना असले काहीही अनुभव नाहीत. तेवढ्यातच साऱ्या विश्वाची चिंता वाहत असल्यासारखा भाव घेऊन अत्यंत गंभीर मुद्रेने डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी आले. त्यांना पाहिल्यावर डॉ. विलास देशपांडे आणि जोशी एका कोपऱ्यात जाऊन काहीतरी बोलत होते. त्यावर म्हैसाळकरांनी कटाक्ष टाकला. त्यातच अतिशय स्थितप्रज्ञ चेहऱ्याने वामन तेलंग तेथे आले. त्यांना हसताना पाहणे हा तसा दुर्मिळ योग आहे. पण गिरीशभाऊ आणि म्हैसाळकर दूर बसलेले पाहून त्यांच्या चेहऱ्यावर हसू आले. मुळात हळुहळू आता गर्दी झाली होती. तेव्हा या पार्टीचे आयोजन आपण का केले, या मुद्याला अक्षयकुमारांनी थेट स्पर्श केला. ते म्हैसाळकरांना उद्देशून म्हणाले, आता महामंडळ आपल्याकडे येणार आहे. अर्थातच संमेलनाची आयोजक संस्थाही आपल्या संबंधातीलच असेल. संमेलनाध्यक्ष होण्यासाठी आयोजक संस्थेची मते फार महत्त्वाची असतात. आयोजक संस्था आणि विदर्भ साहित्य संघाची मते मिळाली तर आपले संमेलनाध्यक्ष होणे निश्चित आहे. याबाबत आपण सहकार्य करावे, असे काळे म्हणाले. (म्हैसाळकर कधीही कुणालाही दुखावत नाही. साहित्य संघाचे अध्यक्षपद मिळवितानाही त्यांनी कुणाला दुखावले नाही. ते शांतपणे आणि प्रेमानेच एखाद्याला दूर सारतात) म्हैसाळकरांनी आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे चेहऱ्यावर मिश्किल हास्य फुलवित ‘अगदी तुमच्यासारखा अभ्यासू आणि विचक्षण लेखकाला संमेलनाध्यक्ष पद मिळावे म्हणून आम्ही संपूर्णपणे तुमच्या पाठीशी राहू’, असे आश्वासन दिले. अक्षयकुमारांना याचा फार आनंद झाला आणि त्यांनी गिरीशभाऊंनाही मदतीचे आवाहन केले. गिरीशभाऊंनीही तत्काळ सारी गणिते जुळवून आणण्याचे वचन दिले. पण अक्षयकुमारांनी गिरीशभाऊंना थेट साकडे घालणे म्हैसाळकरांना आवडले नाही. प्रत्येकाने आपापल्या क्षेत्राच्या मर्यादा पाळायला हव्यात, असे म्हैसाळकर शांतपणे म्हणाले. त्यावर गिरीशभाऊंनीही म्हणजे काय, जरा स्पष्ट करा, अशी विचारणा केली. म्हैसाळकर : हे पहा, आम्ही तुमच्या सामाजिक, राजकीय आणि पर्यावरणाच्या क्षेत्रात लुडबूड करतो का? पण तुम्ही नाट्य संमेलनाच्या आयोजनात समोर असता. तरी आम्ही चूप राहिलो. ते केवळ तुम्ही नागपूरचे आहात म्हणून...पण त्यानंतर तुम्ही कहरच केला. साहित्य संमेलने आमची मक्तेदारी असताना तुम्ही हल्ली साहित्य संमेलनाच्या आयोजनातही उतरला. घुमानच्या संमेलनाच्या निमित्ताने तुमचीच चर्चा होती. हे चालणार नाही. गांधी : पण मी सांस्कृतिक चळवळीसाठीच हे करतो आहे ना? त्यात तुम्ही आक्षेप घेण्यासारखे काहीच नाही. म्हैसाळकर : तुम्ही एवढ्यावरच थांबले नाही तर यशवंतराव प्रतिष्ठान काढून वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून मुद्दाम आम्हाला डिवचता.काळे : नाही नाही. म्हैसाळकर : काळे...याच क्षेत्रात माझे केस पांढरे झाले आहेत(विषय भरकटू नये म्हणून काळे यांनी पुन्हा मुद्याला स्पर्श केला. पण काळे संमेलनाध्यक्ष पदासाठी फिल्डिंग लावत असल्याचे कळल्यावर रवींद्र शोभणे अस्वस्थ झाले. त्यांना कुणीतरी ही बातमी फोनवरच दिली. जवळच शोभणे यांचे ‘मित्र’ राहतात. शोभणे थेट मित्राकडे दुर्बिण घेऊन गेले आणि दुर्बिणीतून काळे यांच्या निवासस्थानी काय सुरू आहे ते पाहायला लागले. शोभणे संमेलनाध्यक्ष पदासाठी बाशिंग बांधून असताना त्यांना काळेंचा अडसर नको होता. )म्हैसाळकर : (काळेंना उद्देशून) आम्ही सहकार्य करू पण पुणे, मुंबई, मराठवाडा येथील मते तुम्हाला कशी मिळतील?काळे : अहो गेल्या तीन वर्षापासून मी ही झुंज देतोय. पुणे, मुंबई आणि मराठवाड्याची ‘सेटिंग’ मी तीन वर्षापासून लावली आहे. (जाडजूड ग्रंथ लिहिणाऱ्या काळेंच्या नियोजनबद्धतेचे म्हैसाळकरांना कुतूहल वाटले. काळे साहित्य संघाच्या कामात असते तर फार बरे झाले असते, असेही त्यांना मनातच वाटले.)म्हैसाळकर : पण तुम्हाला साहित्य संघाचे काम करावे लागेल. प्रतिष्ठानापेक्षा जास्त कार्यक्रम साहित्य संघात करावे लागतील, बोला(त्यांच्या या वाक्याने गिरीशभाऊ जरा अस्वस्थ झाले.) गांधी : म्हैसाळकर सारखे-सारखे तुम्ही प्रतिष्ठानचा उल्लेख का करता आहात...(शोभणेंना काहीही ऐकू येत नसल्याने ते अस्वस्थतेने काळे यांच्या घरी आले. पण त्यांच्या चेहऱ्यावर रंग असल्याने त्यांना कुणी ओळखले नाही. गांधी यांच्या प्रश्नावर म्हैसाळकर चूपच राहिले. )म्हैसाळकर : काळेंनी सारी गणिते जुळवून ठेवलीच असतील तर ठीक आहे. पण गिरीशभाऊंनी संमेलनाच्या खर्चाची तजवीज करावी, असे वाटते.(गिरीश गांधींनी काही मित्रांना फोन लावून संमेलनाच्या खर्चाचा आकडा सांगितला आणि त्यांना तत्काळ तयारही केले. गिरीशभाऊंच्या या कौशल्याचे म्हैसाळकरांना कौतुक वाटले आणि निवडून येणे जमते पण हे एवढेच जमले नाही. नाहीतर खूप काही केले असते, असे म्हैसाळकर मोहितेच्या कानात पुटपुटले. )काळे : पण मध्येच शोभणे उभे राहिले तर.....(हे सारे बोलणे आता भिंतीबाहेरून शोभणे ऐकत होते)म्हैसाळकर : शोभणे माझ्या शब्दाबाहेर जाणार नाही. प्रथम तुम्ही उभे रहा, पुढल्या वर्षी त्यांना उभे राहु द्या. तोपर्यंत दोन वेळा हुकलेला त्यांचा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांना मिळाला तर त्यांचे अधिक वजन वाढेल. (म्हैसाळकर सोबत आहेत आणि गांधींचे सहकार्य आहे म्हटल्यावर काळे यांना आनंद झाला. गालिबच्या दुसऱ्या खंडाचे लेखन तूर्तास थांबवून संमेलनाध्यक्षाचे भाषण मार्मिक व्हावे म्हणून ते विचारात गढले.) एव्हाना भांग मस्त जमली होती पण एलकुंचवार, गांधी आणि म्हैसाळकरांनी त्याला हातही लावला नाही. त्यांनी भाजलेले शेंगदाणे घेतले. एलकुंचवारांचा उपवास असल्याने त्यांनी ते देखील घेतले नाही. पण गिरीशभाऊ आणि म्हैसाळकर यांच्यात काहीतरी संवादाची दरी आहे, हे त्यांना जाणवले. त्यांनी मध्यस्थी करीत दोघांनाही जवळ आणण्याचा प्रयत्न केला. तसे त्यांच्यात भांडणही नव्हते. हा सांस्कृतिक वाद होता. गांधी आणि म्हैसाळकर यांनी एकमेकांना गुलाल लावला आणि यापुढे सोबत काम करण्याचाही संकल्प केला. आता नागपुरात महामंडळ येणार आहे. त्यामुळे आयोजन गांधी करतील आणि महामंडळाचे काम आम्ही करू, असे म्हैसाळकरांनी सांगितले. अक्षयकुमार काळे आणि प्रमोद मुनघाटेंना हा सकारात्मक शेवट खूप आवडला. या दोघांनाही एकत्रित आणता आल्याचा समाधानाचा भाव यावेळी एलकुंचवारांच्या चेहऱ्यावर उमटला. तोपर्यंत सारेच धुळवडीच्या धुंदीत आले होते. ४राजेश पाणूरकर
संमेलनाध्यक्ष पदाची खिचडी अखेर शिजली...
By admin | Published: March 24, 2016 1:25 AM