ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - मुंबई महापालिका निवडणुकीला तीन महिन्यांचा कालावधी उरलेला असताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तळागाळात जाऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यास सुरुवात केली आहे. उद्धव ठाकरे शिवसेना शाखांना भेटी देऊन शाखाप्रमुख, गटप्रमुखांशी संवाद साधत आहेत. गेल्या २० वर्षांपासून मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेची सत्ता आहे.
रस्त्यावरील खड्डे, मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचार यामुळे यंदाची महापालिका निवडणुक शिवसेनेला तितकी सोपी राहिलेली नाही. त्यामुळे उद्धव थेट शाखाप्रमुख, गटप्रमुखांशी संवाद साधून जनमत जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. दहीसरपासून उद्धव यांनी शिवसेना शाखांना भेट देण्याचा कार्यक्रम सुरु केला आहे.
दहीसरमध्ये शिवसेना नगरसेवकांची संख्या जास्त आहे, शिवाय मतदारसंघ फेररचनेनंतर इथे वॉर्डची संख्याही वाढली आहे. उद्धव यांनी आंबावाडी, चुन्नाभट्टी, गावठाण आणि कांदारपाडा येथील शाखांना भेटी देऊन थेट शाखाप्रमुखांशी संवाद साधला. दोन वर्षांपूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत मुंबईत शिवसेने इतकेच भाजपचेही आमदार निवडून आले. त्यामुळे भाजपने मुंबईत पाया विस्तारण्यासाठी मुंबई महापालिका निवडणुकांवर लक्ष केंद्रीत केले आहे.
मागच्या मुंबई महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना राज्यात सत्तेवर नव्हती. पण आता केंद्रात आणि राज्यात शिवसेना सत्तेत भागीदार आहे. त्यामुळे यावेळी मुंबई महापालिकेमधील सत्ता टिकवण्याचे शिवसेनेसमोर मोठे आव्हान आहे.