मुंबई : एसटी कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र स्टेट ट्रान्सपोर्ट कामगार संघटनेने मंगळवारी आझाद मैदानात बेमुदत उपोषण छेडले. मात्र, दिवाळीनिमित्त एसटी प्रवाशांना वाहतुकीत अडथळा निर्माण होऊ नये, म्हणून तूर्तास आंदोलन मागे घेत असल्याची प्रतिक्रिया संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी व्यक्त केली. दरम्यान, प्रशासन आणि संघटनेमध्ये मंगळवारी दुपारी झालेली बैठक निष्फळ ठरल्याने, बुधवारी सकाळी ११.३० वाजता पुन्हा प्रशासनासोबत चर्चा होणार असल्याचेही शिंदे यांनी सांगितले.एसटी कामगारांच्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसनेही उडी घेत आपला पाठिंबा दर्शविला आहे. विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनीही मैदानात येऊन कामगारांना पक्षातर्फे पाठिंबा जाहीर केला. या वेळी शासनाने एसटी कामगारांच्या वेतन करारासाठी ऐतिहासिक वेतनवाढीच्या नावाखाली जाहीर केलेले ४ हजार ८४९ कोटी रुपयांचे वाटप न केल्यास रस्त्यावर उतरू, असा इशारा मुंडे यांनी दिला. येत्या हिवाळी अधिवेशनात या प्रश्नांवर शासन ठोस निर्णय घेण्यास भाग पाडू, असेही मुंडे यांनी आझाद मैदानात केलेल्या भाषणात म्हटले.यानंतर, एसटी कामगारांचे शिष्टमंडळ एसटी प्रशासनाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक रणजीत सिंह-देओल यांच्या भेटीसाठी गेले. मात्र, देओल यांच्यासमवेत झालेली चर्चा अर्धवट राहिल्याने, पुन्हा बुधवारी चर्चा करण्याचा निर्णय घेण्यात आला. दिवाळीनिमित्त ज्या एसटी प्रवाशांनी रिझर्व्हेशन केले आहे, त्यांना प्रवासात अडचण येऊ नये, म्हणून उपोषणाला तात्पुरती स्थगिती देण्यात आली असल्याचे संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी सांगितले.
एसटी कामगारांच्या वेतनवाढीची बैठक निष्फळ!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2018 5:58 AM