नाशिक, आॅनलाइन लोकमतराज्यातील शेतकरी संपाच्या आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी नाशिकमधील मुंबईनाका जवळील एका लॉन्समध्ये शेतकरी संघटनांचे विविध नेते दाखल झाले आहे. लवकरच बैठकीला सुरूवात होणार आहे. शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी द्यावी, स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, शेतीमालाला योग्य हमीभाव द्यावा, अशा विविध मागण्यांसाठी राज्यातील बळीराजाने फडणवीस सरकारविरुध्द एल्गार पुकारला आहे. सात दिवसांपासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या संपामध्ये काही प्रमाणात फूट पडली. त्यानंतर राज्यातील काही बाजारसमित्यांमध्ये काही प्रमाणात व्यवहार सुरू झाल्याचे चित्र होते. पालेभाज्यांचे दर कडाडले असून सर्वसामान्य नागरिकांना मोठा महागाईचा फटका बसत आहे.शेतकरी संपाच्या बाबत संपाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सुकाणू समितीच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांची बैठक नाशिकमध्ये बोलविण्यात आली आहे. या बैठकीकडे अवघ्या राज्याचे नव्हे तर केंद्राचेही लक्ष लागले आहे. बैठकीमध्ये खासदार राजू शेट्टी, आमदार बच्चू कडू, बाबा आढाव, राजू देसले, गिरीधर पाटील आदि मार्गदर्शन करणार आहे. या बैठकीसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बैठकीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी जवळील ईदगाह मैदानावर वाहनतळाची व्यवस्था करण्यात आली आहे. अहमदनगरीमधील पुणतांबा येथून शेतकरी संपाचे नेतृत्त्व नाशिककडे सरकले आहे. शेतकऱ्यांच्या राज्यस्तरीय संपाची पुढील दिशा ठरविण्याबाबत आणि नाशिकमधील नेतृत्वाविषयी बैठकीत निर्णय होणार आहे.