नागपूर : मौजे गोराई येथील ४९६.६ हेक्टर सरकारी जमिनीवरील कांदळवन क्षेत्र भारतीय वन अधिनियमानुसार राखीव वने म्हणून व खासगी क्षेत्रावरील २३५.३६ हेक्टर क्षेत्र वने म्हणून घोषित करण्यात आले आहे. यातील १९६ हेक्टर जमीन एस्सेल इन्फ्रा प्रोजेक्ट लि. व पॅन इंडिया प्रा. लि. यांच्या नावे आहे. उर्वरित क्षेत्रावर तिवरांच्या झाडांची नोंद आहे. या जागेवर भराव टाकल्याचे सदस्यांनी निदर्शनास आणले आहे. यासंदर्भात १० जानेवारीपूर्वी बैठक घेण्याचे आश्वासन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधान परिषदेत लक्षवेधीच्या उत्तरात दिले.विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, सुनील तटकरे व हेमंत टकले आदींनी हा प्रश्न लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला होता. इन्फ्रा प्रोजेक्ट लि. व पॅन इंडिया प्रा. लि. या कंपन्यांनी १५ एकर क्षेत्रावरील कांदळवन नष्ट करून तेथे भराव टाकून कृत्रीम बगिचा निर्माण केल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.उपरोक्त वस्तुस्थितीच्या आधारे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी यांनी गोराई पोलिसात या कंपन्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती मुनगंटीवार यांनी दिली. (प्रतिनिधी)
कांदळवनसंदर्भात १० जानेवारीपूर्वी बैठक; वनमंत्र्यांचे आश्वासन
By admin | Published: December 23, 2015 1:53 AM