मुंबई : सिल्व्हर ओक हल्ला प्रकरणात अटकेत असलेले वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर लोअर परळ येथील घराच्या गच्चीवर गेल्या ६ महिन्यांपासून बैठका सुरू असल्याच्या माहितीवरून पोलीस अधिक तपास करीत आहेत. या बैठका कशासाठी घेतल्या जात होत्या, यामध्ये बैठकांना नियमित उपस्थित राहणाऱ्यांचा पोलीस शोध घेत आहेत. सिल्व्हर ओक परिसरात घुसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी दगड आणि चपलाफेक करीत हल्ला चढविला होता. गावदेवी पोलिसांनी या प्रकरणात गुणरत्न सदावर्ते यांच्यासह आतापर्यंत ११६ आरोपींना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी शनिवारी अजित मगरे नावाच्या आरोपीला अटक केली. मगरे याचा हल्ल्याच्या कटात महत्त्वपूर्ण सहभाग असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे, तर अटकेत असलेला संदीप गोडबोले हा खास हल्ल्यासाठी नागपूरहून मुंबईत आला होता. तो सदावर्ते यांच्या निवासस्थानी ७ एप्रिलला झालेल्या हल्ल्यापूर्वीच्या बैठकीत हजर होता. त्याचा या गुन्ह्यात महत्त्वाचा सहभाग होता, तसेच त्याच्यासोबत अन्य काही व्यक्तीसह पाहिजे आरोपी जयश्री पाटीलदेखील होत्या. गोडबोले याच्याकडून मोबाइल जप्त करणे बाकी आहे. त्याचा अधिक तपास करण्यासाठी नागपूर येथे नेण्याची आवश्यकता असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते. त्यानुसार, दोघांची कोठडी मिळताच, पोलीस अधिक तपास करीत आहे. दुसरीकडे, कर्मचाऱ्यांकडून मी पैसे घेतले नाहीत. मात्र, सदावर्ते यांनी अर्ज तयार केले आणि पैसे गोळा करायला लावले. सदावर्ते आणि गोडबोले यात सहभागी आहेत, असे पाटील याने सांगितले, तर पत्रकार चंद्रकांत सूर्यवंशी यानेही आम्ही काही केले नाही. सर्व काही सदावर्ते यांनी केले. असे न्यायालयाला सांगितले होते.
सीसीटीव्हीची मदत- गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून सदावर्ते यांच्या घराच्या टेरेसवर बैठका सुरू असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. - सीसीटीव्हीच्या मदतीने बैठकांना नियमित हजेरी लावणाऱ्यांचा शोध सुरू आहे, तसेच यामागे आणखी कुणाकुणाचा सहभाग आहे, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.